Join us

डिप्रेशनमध्ये होती मिका सिंगची मॅनेजर सौम्या खान, असा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 10:13 AM

मिका सिंगची मॅनेजर सौम्या खान गत 3 फेबु्रवारीला  मृतावस्थेत आढळली.

ठळक मुद्देसौम्याला आई-वडिल नव्हते. ती पंजाबमध्ये तिच्या आजी-आजोबांसोबत राहायची.

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक आणि भांगडा पॉप स्टार मिका सिंगची मॅनेजर सौम्या खान गत 3 फेबु्रवारीला  मृतावस्थेत आढळली. आता पोलिस अहवालात, सौम्याच्या मृत्यूच्या कारणाचा खुलासा झाला आहे. होय, अत्याधिक मात्रेत ड्रग्जचे सेवन केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. सौम्या गेल्या अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये होती, असे कळतेय.  सौम्याने कुठलीही सुसाईड नोट मागे सोडलेली नाही. त्यामुळे पोलिस संभाव्य कारणांचा तपास करत आहेत. मुंबई मिररने वर्सोवा पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर पी. भोसले यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सौम्या मागच्या काही दिवसांपासून नैराश्याने पीडित होती. अत्याधिक प्रमाणात ड्रग्ज घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

कौटुंबिक मुद्दे आणि तणावामुळे ती मिकाच्या स्टुडिओच्या पहिल्या माळ्यावर एकटी राहत होती. वृत्तानुसार,  रात्रभर पार्टी केल्यानंतर 30 वर्षीय सौम्या सकाळी 7 च्या सुमारास घरी परतली. रात्री उशीरापर्यंत ती घराबाहेर न पडल्याने रात्री सव्वा दहाच्या सुमारास ग्राऊंड फ्लोरवरील एक स्टुडिओ कर्मचारी तिची चौकशी करायला वर गेला असता सौम्या तिच्या खोलीत पडलेली होती. तिला त्वरित डॉक्टरांकडे नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

सौम्याला आई-वडिल नव्हते. ती पंजाबमध्ये तिच्या आजी-आजोबांसोबत राहायची.मिकाने स्वत: सोशल मीडियावर सौम्याच्या निधनाची बातमी शेअर केली होती. आमची प्रिय सौम्या आता या जगात नाही. तिच्या गोड आठवणी मात्र नेहमी आमच्यासोबत असतील. परमेश्वर तिच्या आत्म्याला शांती देवो, असे त्याने लिहिले होते.

टॅग्स :मिका सिंग