प्रत्येक व्यक्तीला प्रेमात पाडणारा, जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणारा म्युझिक अल्बम म्हणजे गारवा. मिलिंद इंगळे आणि सौमित्र अर्थात किशोर कदम यांचा गारवा हा म्युझिक अल्बम तुफान गाजला. आजही या अल्बमला श्रोत्यांकडून तितकंच प्रेम मिळतं. या अल्बममधील एकूण एक गाणी गाजली त्याच गारव्याला आज २४ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मिलिंद इंगळे यांनी पुन्हा एकदा श्रोत्यांना एक छानसा नजराणा सादर करत सुरेल भेट दिली.
आजही युट्यूबवर गारवामधील गाणी टॉप ट्रेंडिंग लिस्टमध्ये असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे या अल्बमला २४ वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त साधत गायक, संगीतकार मिलिंद इंगळे यांनी या अल्बममधील ७ ही गाण्यांचे मुखडे सलग सादर केले. हा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला असून त्याच्यासोबत एक छानसं कॅप्शनही दिलं आहे.
मिलिंद इंगळे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'गारवा वाऱ्यावर भिरभिर पारवा', 'रिमझिम धून आभाळ भरून हरवले मन येणार हे कोण', 'गार वारा हा भरारा नभ टिपूस टिपूस रानीवनी पानोपानी मन पाऊस पाऊस', 'पुन्हा पावसालाच सांगायचे', 'झाडाखाली बसलेले कोणा कुठे रुसलेले','पाऊस दाटलेला माझ्या घरावरी हा', 'गारवा ...', अशी गाणी त्यांनी सादर केल्याचं पाहायला मिळतं.
"आज गारवा अल्बम रिलीज होऊन 24 वर्षे पूर्ण झाली. या काळात तुम्ही सर्वानी दिलेल्या प्रेमाबद्दल मी तुमचा नेहमीच ऋणी राहीन. आज या निमित्ताने मी तुम्हा सर्वांसाठी गारवा मधील 7 ही गाण्यांचे मुखडे सलग गायले आहेत", असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
दरम्यान, आजही पावसाची चाहुल लागल्यावर मराठी रसिकांच्या ओठी सहज ही गाणी येतात. गारवाप्रमाणेच मिलिंद यांचा सांजगारवा हा अल्बमही तितकाच गाजला होता. परंतु, गारवाची जादू आजही रसिकांच्या मनावर कायम असल्याचं पाहायला मिळतं.