Join us

सिद्धार्थ- मृण्मयीच्या ‘मिस यू मिस्टर’चा बोल्ड आणि हटके टीझर तुम्ही पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 5:00 PM

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्दे‘मिस यू मिस्टर’ २८ जून २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहेमृण्मयी आणि सिद्धार्थची जोडी या सिनेमात दिसणार आहे

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे ही ग्लॅमरस जोडी ‘मिस यू मिस्टर’ या आगामी मराठी चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर निर्मात्यांनी आज प्रकाशित केला. यातील ‘बोल्ड’ आणि ‘हटके’ दृश्ये या टीझरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आली असून त्याचाच बोलबाला सध्या सोशल मिडियावर होतो आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे अजून एक नवीन पोस्टर देखील आज प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची रसिकांमधील उत्सुकता प्रचंड ताणली गेली आहे. ‘मिस यू मिस्टर’ २८ जून २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

 अनेक गाजलेले चित्रपट आणि लोकप्रिय टीव्ही मालिका ज्यांच्या नावावर आहेत असे समीर जोशी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून केवल हांडा, संदीप भार्गव आणि मनीष हांडा यांनी सह-निर्मिती केली आहे. थर्ड आय क्रिएटिव्ह फिल्म्सच्या सहकार्याने मंत्रा व्हिजन या कंपनीने ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.

‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. त्यातून या चित्रपटाची कथा संकल्पना अधोरेखित होतेच, पण त्याचबरोबर आज प्रकाशित झालेल्या टीझरमुळे कथेचा पोत अधिकाधिक उलगडत जातो. आपल्या करियरच्या निमित्ताने आजची तरुण जोडपी एकमेकांपासून दूर राहतात, त्यांच्यातील दुरावा वाढतो. प्रेमाच्या नात्याला ओढ लागते, तर कधीकधी त्यावर ताणही येतो. अर्थातच त्यांच्या नात्यामध्ये, कौटुंबिक बंधांमध्ये अनेक बदल घडतात. नव्या पिढीच्या नजरेतून, त्यांच्या जीवनशैलीचे प्रदर्शन घडवत ही कथा आकाराला येते. त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

मराठीत अभावानेच दिसणारी काही ‘बोल्ड’ दृश्ये या चित्रपटात आहेत. आज प्रदर्शित झालेला टीझर त्याची झलक देतो. त्याची सध्या सोशल मिडीयावर चर्चा आहे. ‘मिस यू मिस्टर’चे एक पोस्टर निर्मात्यांनी नुकतेच प्रकाशित केले होते. त्याबद्दलही रसिकांमध्ये चर्चा आहे. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे असे या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर जोशी म्हणाले. 

चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली, “मिस यू मिस्टर'मध्ये मी 'कावेरी' नावच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या सिनेमातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते.”

‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “मृण्मयीबरोबर काम करताना खूप मजा आली. या चित्रपटामध्ये मी ‘वरूण' नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले असून त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे.”

‘मिस यू मिस्टर’चे दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, “ही काही फक्त वरुण आणि कावेरीची गोष्ट नाही, तर कामानिमित्त एकमेकांपासून दूर रहायची वेळ आलेल्या प्रत्येकाची गोष्ट आहे. एकमेकांवर अतीव प्रेम असणाऱ्यांना एकमेकांपासून दूर रहायची वेळ आली तर ते अंतर फक्त शारीरिक नाही,पण त्यामुळे नात्यामध्ये अंतर पडतं? आणि जर असं अंतर पडलं तर ते मिटवण्यासाठी काय करावं, या सर्वांबद्दल हसत-खेळत, कधी डोळ्यांच्या कडा ओलावत सांगितलेली ही गोष्ट आहे,” ते म्हणतात. समीर जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. बस स्टॉप (२०१७), मामाच्या गावाला जाऊया (२०१४), मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३) असे गाजलेले मराठी चित्रपट जोशी यांच्या नावावर आहेत. 

मंत्रा व्हिजन ही एक बहुआयामी निर्मिती कंपनी असून अर्थपूर्ण आणि उच्च दर्जाची निर्मिती मूल्य असलेले कार्यक्रम करण्यावर तिचा भर असतो. चित्रपट, डिजिटल मीडिया, नुत्य नाटिका तसेच उर्वशी सारख्या रंगमंच कार्यक्रमात कंपनी कार्यरत आहे.

दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे हे ‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाचे निर्माते आहेत. दीपा यांना तब्बल चार दशकांचा गारमेंट आणि निर्यात क्षेत्रातील अनुभव आहे. त्यांनी आत्तापर्यंत चित्रपट, डान्स ड्रामा आणि टेलिव्हिजन मालिकांची निर्मिती केली आहे. त्या एक स्वयंनिर्मित उद्योजिका आहेत. सुरेश म्हात्रे हे जाहिरात क्षेत्रातील आघाडीचे नाव आहे. त्यांनी आत्तापर्यंत २५० हूनही अधिक कॉर्पोरेट आणि जाहिरात लघुपट केले आहेत. इंजीनियरिंग आणि मॅनेजमेंटमधील पदवी धारण केलेले म्हात्रे हे कॉर्पोरेट जगतात चार दशकांहूनही अधिक काळ कार्यरत आहेत. त्यांनी २०१४मध्ये डायरेक्टर'स रेअर या अंतर्गत तसेच पीवीआरने प्रस्तुत केलेल्या ‘सुलेमानी किडा’ या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

टॅग्स :मृण्मयी देशपांडेसिद्धार्थ चांदेकर