ठळक मुद्देमिस वर्ल्ड 2019 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सुमन राव हिला या स्पर्धेत तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
साऊथ आफ्रिकेच्या जोजिबिनी टूंजी हिने मिस युनिव्हर्स 2019 चा किताब जिंकल्यानंतर शनिवारी रात्री लंडनमध्ये पार पडलेल्या सोहळ्यात ‘मिस वर्ल्ड 2019’ची घोषणा करण्यात आली. जमैकाच्या टोनी एन सिंह हिने यंदाच्या ‘मिस वर्ल्ड 2019’चा किताब आपल्या नावावर केला. फ्रान्सची ओफिनी मेजिनो या स्पर्धेची फर्स्ट रनरअप ठरली. तर भारताची सुमन राव हिला या स्पर्धेची सेकंड रनरअप म्हणून समाधान मानावे लागले.
110 देशांच्या सौंदर्यवतींना मागे टाकत टोनीने ‘मिस वर्ल्ड 2019’चा किताब जिंकला. टोनीला सिंगींग, ब्लॉगिंग आवडते. भविष्यात डॉक्टर बनण्याचा तिचा इरादा आहे. जमैकाच्या मोरेट येथे जन्मलेली टोनी वयाच्या नवव्या वर्षी आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत स्थायिक झाली.
मानसशास्त्राची पदवीधर असलेल्या 23 वर्षांच्या टोनीने यापूर्वी मिस जमैका वर्ल्ड 2019 चा किताब जिंकला होता. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी जमैकाची ती चौथी सौंदर्यवती ठरली आहे.
गत 8 डिसेंबरला अटलांटा येथे पार पडलेल्या ‘मिस युनिव्हर्स 2019’ या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या जोजिबिनी टुंजी हिने मिस युनिव्हर्सच्या किताबावर आपले नाव कोरले होते.
भारताची सुमन राव तिस-या क्रमांकावर
मिस वर्ल्ड 2019 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सुमन राव हिला या स्पर्धेत तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मुळची राजस्थानची रहिवासी असलेल्या सुमनने गत जून महिन्यात मिस इंडियाचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने लंडनमध्ये आयोजित मिस वर्ल्ड 2019 स्पर्धेची तयारी सुरु केली होती. सुमन रावला भविष्यात अभिनेत्री बनायचे आहे. सध्या ती मॉडेलिंग व शिक्षणात बिझी आहे.