- Suvarna Jain
आपल्या अभिनयाने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयाच्या या सुपरस्टारनं सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली आहे. रुपेरी पडद्यावर विविध सिनेमांतून त्यानं सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलाच आहे. आता रियल लाइफमध्येसुद्धा आमिरची सामाजिक बांधिलकी पाहायला मिळत आहे. आधी 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमिरनं विविध प्रथा आणि परंपरा याविरोधात आवाज उठवला. आमिरच्या व्यक्तिमत्त्वाचा हा रियल पैलू रसिकांच्या काळजाला चांगलाच भिडला. आमिर एवढ्यावरच थांबलेला नाही. त्याने गेल्या वर्षापासून महाराष्ट्राच्या भीषण पाणी समस्येवर तोडगा काढण्याचं मिशन हाती घेतलं आहे. महाराष्ट्राला दुष्काळाच्या दुष्टचक्रातून सोडवण्याचा निर्धार आमिर खान आणि पानी फाउंडेशननं केला आहे. याच आपल्या मिशनसाठी आमिर खाननं नुकतीच 'चला हवा येऊ द्या' शोमध्ये हजेरी लावली. या वेळी आमिरचं मिशन, त्याच्या आगामी योजना आणि सिनेमा याविषयी साधलेला हा खास संवाद.महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने एक मिशन हाती घेतलं आहे, ते अधिकाअधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक उपक्रम राबवला जाणार आहे, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल?'पानी फाउंडेशन'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील पाणी समस्या दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशानं आम्ही एक मिशन हाती घेतलं आहे. या फाउंडेशनमध्ये 'सत्यमेव जयते'च्या कोअर टीमचा समावेश आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रातील दुष्काळ, पाण्याची समस्या लक्षात घेऊन आम्ही 'सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धा सुरू केली. गावागावांत जलसंधारण आणि पाणलोट व्यवस्थापनाची उत्तम कामगिरी करण्यासाठी निर्माण केलेली चुरस म्हणजे वॉटर कप स्पर्धा. पहिल्या वर्षी या स्पर्धेत ३ तालुक्यांचा समावेश आम्ही केला होता. मात्र यंदा आमचं ध्येयं मोठं आहे. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेसाठी आम्ही ३० तालुक्यांची निवड केली आहे. या स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१७ असा असेल. यासाठी आम्ही १० हजार लोकांना प्रशिक्षण दिलं असून, ते ग्रामस्थांना प्रशिक्षण देतील. गेल्या वर्षी या स्पर्धेच्या काळात आम्ही एक कार्यक्रम सुरू केला होता. अधिकाअधिक लोकांपर्यंत एकाच वेळी पोहोचण्यासाठी आम्ही एक वेगळा उपक्रम हाती घेणार आहोत. यंदा आम्ही जो कार्यक्रम करणार आहोत तो एकाच चॅनलवर प्रसारित न होता सर्व मराठी चॅनलवर एकाच वेळी प्रसारित करणार आहोत. जेणेकरून सर्वदूर महाराष्ट्रात आमचा संदेश आणि आमची ही स्पर्धा पोहोचेल. त्यामुळे एकाच वेळी, एकाच तारखेला हा शो प्रसारित करण्यात येईल.पानी फाउंडेशनच्या माध्यमातून कशा प्रकारे काम सुरू असतं? पानी फाउंडेशनचं काम ठराविक वेळेपुरतं मर्यादित नाही. यावर आमचं वर्षभर काम सुरू असतं. आमची कोअर टीम २० जणांची आहे. त्यानंतर दोन वेगवेगळे तालुका कॉ-आॅर्डिनेटर असतात. त्यांच्या माध्यमातून हे काम सुरू असतं. याअंतर्गत आम्ही एक ट्रेनिंग कार्यक्रम बनवतो. त्यानुसार लोकांना ट्रेन करतो. या काळात वॉटर कप स्पर्धेसाठी अर्ज करण्यासाठी आम्ही त्यांना वेळ देतो. गावांनी अर्ज केल्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ग्रामपंचायतीने निवडलेल्या पाच गावकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. एप्रिल आणि मे हा वॉटर कप स्पर्धेचा कालावधी असतो. या कालावधीत मिळालेल्या प्रशिक्षणानुसार गावकऱ्यांनी गावात जलसंधारणाची कामं करायची असतात. पाणलोटच्या विकासासाठी काम करायचं असतं. मे महिन्यात गावाच्या प्रगतीचं सादरीकरण करावं लागतं. त्यानंतर जून-जुलैमध्ये स्पर्धेचे परीक्षक तपासणी करून त्यांना गुण देतात. जुलै-आॅगस्ट या कालावधीत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना भेट दिली जाते आणि निकाल जाहीर करून वॉटर कपचे विजेते जाहीर केले जातात. सप्टेंबर महिन्यात पुढच्या कामांना लगेच सुरुवात होते. लोकांना आम्हाला काहीही शिकवायचं नाही. त्यांचं फक्त प्रबोधन करायचं आहे. आपल्या समस्येचं उत्तर आपणच शोधू शकतो, याची जाणीव त्यांना करून द्यायची आहे. आम्हाला फक्त या उपक्रमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसांपर्यंत पोहचायचं आहे. आमचं लक्ष्य आहे ते महाराष्ट्राच्या ८६ हजार गावांपर्यंत पोहोचून पाणी समस्येवर तोडगा काढण्याचं आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुजलाम्-सुफलाम् बनवण्याचं.सध्या टेकटॉकविषयी भरपूर चर्चा असते. बरेच सेलिब्रिटी ते करतात. किंग खान शाहरुखही ते करतो. तुला कधी करायला आवडेल का?टेकटॉकमध्ये मला फारसा रस नाही. कारण, मला कोणी प्रश्न विचारले, तर त्याची उत्तरं मी सहज देऊ शकतो. मात्र, टेकटॉकमध्ये तसं काही नसतं. तुम्हाला १५ ते २० मिनिटे स्वत:हून बोलायचं असतं. मर्यादित वेळेत उगाच एकटंच बडबड करण्यात मला बिलकूल रस नाही.तू इतके चांगले मराठी बोलतोस, बॉलिवूडप्रमाणेच रसिकांना तुला मराठी सिनेमातही पाहायचं आहे? तुला मराठी सिनेमात पाहण्याची रसिकांची इच्छा कधी पूर्ण होणार? - मी मराठीमधून संवाद साधण्याचा प्रयत्न करीत असतो. माझ्या मराठी बोलण्याला मी २०० गुण देईन. मात्र, हा गंमतीचा भाग असला, तरी माझं मराठी काही इतकं छान नाही. मी चांगला विद्यार्थी नाही, असं मला वाटतं. जे काही मी बोलतो ते माझ्या गुरूंचं श्रेय आहे. कॅमेऱ्यासमोर जर कुणी माझ्याशी मराठीत बोलत असेन, तर मी त्यांना मराठीत उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्या वेळी पटकन काही शब्द आठवत नाही. त्यामुळे अडखळत-अडखळत मराठी बोलत माझ्या बोलण्याचा ट्रॅक आपोआप हिंदीवर जातो. भाषांमध्ये मी थोडा कच्चा आहे, असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. तरीही परफेक्ट मराठी बोलण्यासाठी आणखी ३-४ किंवा ५ वर्षे तरी लागतील. जेव्हा उत्तम मराठी बोलेन त्याच वेळी मराठी सिनेमात काम करीन.
तुझ्या आगामी सिनेमाविषयी जाणून घ्यायला आवडेल?आधी महिलांच्या विषयावर आधारित 'दंगल' हा सिनेमा केला. 'सिक्रेट सुपरस्टार' हा माझा सिनेमाही महिलांवरच आधारित असणार आहे. एका वेळी मला एकाच प्रोजेक्टवर काम करायला आवडतं. 'दंगल' सिनेमा करत होतो, त्या वेळी फक्त आणि फक्त 'दंगल' सिनेमावर काम करीत होतो. त्यानंतर पानी फाउंडेशनचं काम सुरू झालं. त्यात लक्ष घातलं. आता जूनमध्ये 'ठग्स आॅफ हिंदुस्तान' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे. त्यांची एक्साईटमेंट आहे.