स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या मिशन मंगल सिनेमाने आपली बॉक्स ऑफिसवरील घौडदौड दुसऱ्या दिवशी ही कायम ठेवली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 29.16 कोटींची कमाई करत नवा विक्रम रचला. दुसऱ्या दिवशी या सिनेमाने 17.28 कोटींची कमाई केली. त्यामुळे या सिनेमाची दोन दिवसांतील कमाई 46.44 कोटी झाली आहे.
‘मिशन मंगल’ हा सिनेमा भारताच्या मंगळ मोहिमेची विजयगाथा सांगणारा चित्रपट आहे. अक्षयने यात राकेश धवनची व्यक्तिरेखा साकारली आहे. यापूर्वी अक्षयच्या 2018 मध्ये प्रदर्शित ‘गोल्ड’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानेदेखील पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 25.25 कोटींची कमाई केली होती. परंतु, ‘मिशन मंगल’ ने या चित्रपटालाही मागे टाकले. गेल्या काही वर्षांत अक्षयने सामाजिक आणि देशभक्तीपर चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचे हे चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. ‘मिशन मंगल’ हा त्यापैकीच एक.
24 सप्टेंबर 2014 मध्ये भारताच्या शास्त्रज्ञांनी मंगळावर ‘मंगळयान 1’ पाठविले होते. मंगळयान बनवणे हे भारतापुढील मोठे आव्हान होते. कारण हे यान घडवण्यासाठी लागणारा खर्च हा भारताला परवडण्यासारखा नव्हता. परंतु राकेश धवन आणि त्यांच्या सहका-यांनी हे आव्हान पेलत अतिशय कमी खर्चात ही मोहिम फत्ते केली होती. पहिल्याच प्रयत्नात आणि अतिशय कमी खर्चात ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. हीच कथा ‘मिशन मंगल’ या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.