मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केली. याशिवाय त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला असंही डॉक्टरांनी सांगितलं. अशातच रविवारी मिथुन यांचा हॉस्पिटलमधून पहिला व्हिडिओ समोर आला.
मिथुन चक्रवर्ती डॉक्टरांशी बोलताना दिसले. त्यावेळी त्यांच्यासोबत पश्चिम बंगाल भाजपचे प्रमुख सुकांत मजुमदार दिसले. व्हिडिओत मिथुन हॉस्पिटलच्या बेडवर बसलेले दिसत आहेत. डॉक्टर त्यांना सांगतात, "आता तुम्ही ठीक आहात, सलाईन चालू आहे, तुम्ही पुरेसे पाणी पीत आहात. असंच पाणी पीत राहा.' यानंतर मिथुन त्यांच्या पायाकडे बोट दाखवून काहीतरी बोलतात. न्यूज एजन्सी एएनआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
तत्पूर्वी, रुग्णालयाने एक निवेदन जारी करून मिथुन पूर्णपणे शुद्धीत असल्याचे म्हटले होते. निवेदनात म्हटले आहे की, "त्यांना ब्रेन इस्केमिक सेरेब्रोव्हस्कुलर अपघात (स्ट्रोक) झाला होता. जेव्हा त्यांना रुग्णालयात आणले तेव्हा त्यांनी उजव्या बाजूच्या वरच्या बाजूला अशक्तपणाची तक्रार केली. त्यांच्यावर सतत डॉक्टरांची देखरेख आहे." मिथुन यांची भेट घेण्यासाठी क्रिकेटपटू सौरव गांगुलीही रुग्णालयात पोहोचला आहे.