सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Chandrakant Desai) यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी कर्जतच्या एन डी स्टुडिओतच आपले जीवन संपवले. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आठवणी कलाकार सांगत आहेत. दरम्यान नितीन चंद्रकांत देसाईंच्या शेवटच्या फेसबुक पोस्टनेही सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे.
नितीन देसाई यांनी फेसबुकवर शेवटची पोस्ट २६ जानेवारीला केली होती. यात त्यांनी महाराणा प्रताप यांच्यावरील वेब सीरिजचा टीझर शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये म्हटले होते की, मिट्टी से जुडे हैं.. मिट्टी के लिये लडे थे.. देखिये महाराणा प्रताप की असीम बहादुरी की कहानी. महाराणा.शूटिंग सुरू. त्यानंतर त्यांनी कोणतीच पोस्ट त्यांच्या फेसबुकवर शेअर केलेली नाही.
नितीन चंद्रकांत देसाई सिनेविश्वातील सर्वात मोठे नाव. २००५ साली हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जतमध्ये उभारला. मराठी रसिकांना अभिमान वाटेल असा भव्य 'एनडी स्टुडिओ' त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांचं चित्रीकरण झाले आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले होते. 'परिंदा', 'डॉन', 'लगान', 'देवदास', 'जोधा अकबर', 'हम दिल दे चुके नम' अशा अनेक सिनेमांचे कला दिग्दर्शन त्यांनी केले. तर 'बालगंधर्व' सारख्या मराठी सिनेमाचंही कलादिग्दर्शन केले. 'देवदास','खामोशी' या सिनेमांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.