पाकिस्तानातील कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती, ती आता मुंबई उच्च न्यायालयाकडून हटवण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी कलाकारांना हिंदी सिनेमांचे पार्श्वगायन करण्यास बंदी घातली होती. २०१६मध्ये उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली होती.
राज्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने देखील पाकिस्तानी कलाकार आणि गायक यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. पाकिस्तानी कलाकारांनी भारतात येऊन दाखवाच, असं आव्हान देखील मनसेने दिलं होतं. न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्याची बंदी हटवल्यानंतर मनसेने पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत भारतातील निर्माते आणि पाकिस्तानी कलाकारांना इशारा दिला आहे. अमेय खोपकर म्हणाले की, अतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलीवूड फिल्ममध्ये गाण्यासाठी इथलेच काही निर्माते पायघड्या घालतायत. विरोध झाला तर फाट्यावर मारण्याची भाषा अरिजीत सिंग करतोय. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बळावर फुरफुरणाऱ्यांची मस्ती आता उतरवावीच लागेल, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला.
पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय हेच दुर्दैव आहे, पण तरीही सांगतोच. पाकिस्तानी कलाकार इथे खपवून घेतले जाणार नाहीत म्हणजे नाहीत, हीच मनसेची भूमिका होती, आहे आणि पुढेही राहणार. फक्त बॉलीवूडच नाही तर कोणत्याही भाषेतील चित्रपटात पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करुन दाखवाच. हे चॅलेंज स्वीकारण्याची हिंमत कुणी करु नये, एवढाच सल्ला आत्ता देतोय, असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्या भारतीय, कंपन्या आणि गटांवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याने माहिती आणि प्रसारण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाकडे पाकिस्तानी कलाकारांना व्हिसा देणे थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने सलोखा आणि शांततेचे महत्त्व लक्षात घेऊन ही याचिका फेटाळली आहे.