मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे तसेच मास्कचा सतत वापर करावा असे सरकार सांगत आहे. तरीही मुंबईतील अनेक ठिकाणी लोक गर्दी करत असत असल्याचे दिसून येत आहे. वरळी येथील एका पबमध्ये तर लोक प्रचंड गर्दी करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी मीडियात आली होती आणि आता वरळीत मध्यरात्रीपर्यंत दिशा पटानी आणि जॉन अब्राहमच्या चित्रपटाचे चित्रीकरण भरवस्तीत करण्याची परवानगी देण्यात आली असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदार संघ असल्याने या मतदारसंघाकडे नेहमीच सगळ्यांचे लक्ष लागलेले असते. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत वरळीत चित्रपटाच्या चित्रीकरणाची परवानगी देण्यात आल्याचा आरोप मनसेचे वरळी विधानसभा अध्यक्ष संतोष धुरी यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
संतोष धुरी यांनी ‘केम छो वरळीचे मराठी सत्य’ अशा शीर्षकाखाली व्हिडीओ शेअर करत ‘युवराजांची दिशा चुकली’ असा उल्लेख केला आहे. दिशा आणि आदित्य यांच्या मैत्रीची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते. त्यांनी या पोस्टद्वारे आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधाला आहे.
या व्हिडिओद्वारे संतोष धुरी यांनी दावा केली आहे की, वरळी कोळीवाडा येथे संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत दिशा पटानी आणि जॉन अब्राहमच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होतं. या चित्रीकरणामुळे प्रचंड गर्दी झाली होती. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. अनेकांनी मास्क देखील घातले नव्हते. या चित्रीकरणास युवराजांचा आशीर्वाद आहे की महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांचा... असा सवाल त्यांनी विचारला आहे. पबच्या प्रकरणानंतर आता महानगरपालिकेचे अधिकारी या चित्रीकरणाला परवानगी देत असतील तर ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे.