अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेविषयी (Poonam Pandey) धक्कादायक बातमी समोर येत आहे. पूनम पांडे हिचे सर्व्हायकल कॅन्सरमुळे निधन झालं आहे. तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. तिच्या टीमकडून पूनमच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. तर या सर्व्हायकल कॅन्सरबद्दल आपण जाणून घेऊया.
गर्भाशय मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर (Cervical Cancer). गर्भाशय आणि योनीमार्गाला जोडणारा भाग म्हणजे सर्व्हिक्स किंवा ग्रीवा. हा भाग गर्भाशयाच्या खालच्या बाजूस योनीमार्गात उघडतो. स्त्रियांना याच ठिकाणी गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होतो. सर्व्हायकल कॅन्सर हा धोकादायक आहे. हा जागतिक स्तरावर महिलांमध्ये सर्वात वेगाने वाढणारा कॅन्सर आहे. ज्यामुळे दरवर्षी लाखो महिलांचा मृत्यू होतो. ब्रेस्ट कॅन्सरनंतर (breast cancer) भारतात महिलांना या आजाराचा सर्वाधिक त्रास होतो. मात्र, या आजाराबाबत लोकांमध्ये अजूनही जागरुकतेचा अभाव आहे.
HPV म्हणजेच 'ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस' हा शरीरात पसरल्यामुळे सर्व्हायकल कॅन्सरची समस्या दिसून येते. या एचपीव्ही विषाणूचे 100 पेक्षा जास्त प्रकार आहेत. HPVच्या संसर्गामुळे गर्भाशयाच्या मुखाशी असलेल्या पेशींमध्ये अचानक वाढ होऊन कॅन्सर होऊ शकतो. शारीरिक संबंध (Physical Relation) हे या कॅन्सरचं प्रमुख कारण आहे. सर्व्हायकल कॅन्सर हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज (Sexually Transmitted Diseases) आहे.
शारीरिक संबंधामुळे हा विषाणू पुरुषांच्या माध्यमातून महिलांमध्ये पसरतो. एकापेक्षा अधिक पुरुषांशी असुरक्षित शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांमध्ये हा कॅन्सर आढळतो. पाच वर्षापेक्षा जास्त काळ सातत्यानं गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करणं, धूम्रपान या गोष्टींमुळे महिलांना सर्व्हायकल कॅन्सरचा धोका जास्त असतो. जर सर्व्हायकल कॅन्सरपासून वाचयचे असेल, तर नियमितपणे पॅप चाचण्या करणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांनी प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न केल्यास वेळीच रोगाचे निदान होऊ शकते. तसेच भारतात या कॅन्सरविरुद्ध लढण्यासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मोहीम राबवण्यात येणार असून 14 वर्षापुढील तरुणींना आणि महिलांनीही ही लस घेता येणार आहे.