मुंबई - भारत सरकारतर्फे दिला जाणारा चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान दादासाहेब फाळके पुरस्कारासारख्या समान नावाच्या पुरस्कारांच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस मॉडेल निकित घागने दाखवले आहे. निकिताने गेल्या वर्षी मिळालेला दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. दादासाहेब फाळके यांच्या नावाने सुरू असलेला हा घोटाळा उघड करणे अत्यंत गरजेचे असल्याचं ती म्हणाली.
निकिता घागने सांगितले की, दादासाहेब फाळके यांच्या नावाने भारत सरकार चित्रपटसृष्टीचा सर्वोच्च सन्मान राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या रूपाने देते हे माझ्यासारख्या अनेक नव्या कलाकारांना माहीत नाही. दादासाहेबांचा सन्मान राखण्यासाठी या पुरस्कारासारख्या समान नावांच्या पुरस्कारावर बंदी घालण्याची मागणीही मी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे असं तिने सांगितले.
तसेच जेव्हा आम्हाला कोणत्याही चांगल्या कामासाठी पुरस्कार मिळतो, तेव्हा ते आम्हाला चांगले काम करण्यास प्रेरित करते. कोणत्याही चांगल्या सामाजिक कार्यासाठी कौतुक हा सर्वात मोठा पुरस्कार असतो, पण मला मिळालेल्या 'दादासाहेब फाळके' पुरस्कारामागे एक संपूर्ण यंत्रणा कार्यरत असल्याचे मला गेल्या तीन-चार दिवसांतच कळले त्यामुळे मी हा पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला असंही निकिता घागने सांगितले. पुरस्काराच्या मागे धावणाऱ्या मुंबईतील फिल्म इंडस्ट्रीत पहिल्यांदाच एखाद्या मॉडेल किंवा अभिनेत्रीने तिला मिळालेला दादासाहेब आंतरराष्ट्रीय पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. सुपरमॉडेल निकिता घाग, ही गेल्या नऊ वर्षांपासून पशु सेवा संस्था दावा इंडिया चालवत आहे.
दरम्यान, दादासाहेब फाळके यांच्या नावाने फाळके पुरस्कार सुरू झाल्याबद्दल आम्ही कुटुंबीय स्वतःला भारत सरकारचे ऋणी समजतो.' सिनेमाच्या या सर्वात मोठ्या पुरस्कारामुळे आज दादासाहेब फाळके यांना सर्वजण ओळखतात. पण, या पुरस्कारासारख्या समान पुरस्कारांच्या नावाने लोक दुकाने चालवतात तेव्हा वाईट वाटते. एकीकडे अमिताभ बच्चनसारख्या व्यक्तिमत्त्वाला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले जाते आणि दुसरीकडे मुंबईत फाळके यांच्या नावाने कोणीही पुरस्कार देऊन जातो, हे पाहून वाईट वाटते अशी भावना दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांनी व्यक्त केली.
रणबीर, आलियाने हा पुरस्कार परत करावानव्या पिढीला सहसा पुरस्कारांबद्दल इतके तपशील माहीत नसतात. 'नवीन पिढीला पटवून देण्याची जबाबदारी त्या सर्व लोकांवर आहे ज्यांना जग आपला आदर्श मानते. मी तरुण कलाकारांना, विशेषत: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांना आवाहन करते, ज्यांनी यावर्षीचा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला आहे, त्यांनी हा बनावट 'दादासाहेब फाळके पुरस्कार' परत करावा, जेणेकरून या नावाचे पावित्र्य काय आहे हे जगाला कळेल असं निकिता घागने म्हटलं.