मोगुल या चित्रपटाचा दिगदर्शक सुभाष कपूरचे नाव मीटू प्रकरणात आल्यानंतर आमिर खानने या चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याने हा चित्रपट सोडला असल्याचे त्याने काही महिन्यांपूर्वी ट्वीट करून सांगितले होते. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये म्हटले होते की, लैंगिक अत्याचार ही गोष्ट चुकीची असून याचे कधीच समर्थन करता येणार नाही. आमिर खान प्रॉडक्शनमध्ये या गोष्टींना किंवा असे करणाऱ्या लोकांना कधीच थारा देण्यात आलेला नाही. दोन आठवड्यापासून या मोहिमेद्वारे अनेक जण पुढे येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडत आहेत. या प्रकरणात बॉलिवूडमधील काही मंडळींची नावे घेण्यात आली आहेत. त्यातील एका व्यक्तीसोबत आम्ही काम करायला सुरुवात करणार होतो. आम्ही त्याबाबत चौकशी केली असता आम्हाला कळले की, त्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचा निर्णय देण्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे मी माझ्या आगामी प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचे ठरवले आहे.
पण आता आमिरने त्याचा निर्णय बदलला असून मोगुल या चित्रपटात तो काम करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. मोगुल हा चित्रपट गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर बेतलेला असून यात आमिर खान गुलशन कुमार यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव करणार आहेत. या चित्रपटात गुलशन कुमार यांच्या भूमिकेसाठी अक्षय कुमार योग्य असल्याचे आमिर खानला वाटत होते. त्यामुळे त्याने या चित्रपटाची ऑफर देखील अक्षयला दिली होती. अक्षयने या ऑफरवर विचार देखील केला होता. पण काही गोष्टी जुळत नसल्याने आणि तो इतर चित्रपटांमध्ये व्यग्र असल्याने त्याने या चित्रपटास नकार दिला.
अक्षयने नकार दिल्यानंतर आमिरने या चित्रपटासाठी वरुण धवनला विचारले होते. पण वरुण सध्या त्याच्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्याने देखील हा चित्रपट करण्यास नकार दिला.
आमिर खानने अक्षय आणि वरुणनंतर गुलशन कुमार यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माला देखील विचारले होते. कपिल ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारू शकेल असे त्याला वाटत होते. पण काही कारणामुळे कपिलदेखील या चित्रपटाचा भाग होऊ शकला नाही. शेवटी भुषण कुमार यांनी आमिर खानला ही भूमिका साकारण्याबाबत सुचवले आणि आमिरला देखील या चित्रपटाची कथा आणि त्याची भूमिका खूपच आवडली असल्याने त्यानेच या चित्रपटात गुलशन कुमार यांची मुख्य भमिका साकारण्याचे ठरवले.