Join us

गीतकार मजरूह सुलतानपुरींना जीवनगौरव, तर जावेद अलीला मोहम्मद रफी पुरस्कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 18:13 IST

मजरूह सुलतानपुरी यांना मरणोत्तर जीवनगौरव देण्यात येणार असून त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव  अंदलिब मजरूह सुलतानपुरी हे पुरस्कार स्वीकारतील.

१९५० व १९६० च्या दशकांमध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या आणि सर्वात लोकप्रिय गीतकारांपैकी एक असलेल्या असलेल्या मजरूह सुलतानपुरी(Majrooh Sultanpuri) यांना यावर्षीचा मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.  तर हिंदीसह  बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, तामिळ, तेलगू आणि उर्दू अशा विविध प्रादेशिक भाषांमध्ये आवाज देणाऱ्या ख्यातनाम गायक जावेद अली (Javed Ali) यांना मोहम्मद रफी पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे महामाहीम राज्यपाल  सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.

मजरूह सुलतानपुरी यांना मरणोत्तर जीवनगौरव देण्यात येणार असून त्यांच्या वतीने त्यांचे चिरंजीव  अंदलिब मजरूह सुलतानपुरी हे पुरस्कार स्वीकारतील. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी यांच्या वाढदिवसादिवशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव आणि मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. यंदाचे वर्ष हे मोहम्मद रफी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. पुरस्काराचे हे १८ वे वर्ष असून एक लाख रूपये धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रू. रोख आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे स्वरूप आहे. 

यावर्षी गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि गायक जावेद अली यांना पुरस्कार जाहीर करताना आपल्याला अतिशय आनंद होतो आहे, असे सांगताना मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारे आणि त्याकाळी फिल्मफेअर आणि दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणारे गीतकार मजरूह सुलतानपुरी यांचा प्रवास अत्यंत हृदयस्पर्शी आहे. त्यांना मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्काराने आणि प्रसिद्ध गायक जावेद अली यांना मोहम्मद रफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आम्हाला अतिशय आनंद होत आहे. रफी साहेबांचा १०० वा.वाढदिवस असल्यामुळे त्यांचे जन्मशताब्दी वर्षा  निमित्ताने या पुरस्काराचे एक वेगळे महत्त्व आहे. 

वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वा. सुरू होणार आहे.

टॅग्स :जावेद अलीसंगीतबॉलिवूडभारत