ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांचे काल रात्री साडेनऊ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. खय्याम यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक अनमोल हिरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. गत 28 जुलैला खय्याम त्यांच्या आर्मचेअरवरून पडले होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे दीर्घकाळापासून ते आजारी होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आज सकाळी खय्याम यांचे पार्थिव त्यांच्या जुहूस्थित घरी आणले गेले. यानंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले.
अभिनेत्री पुनम ढिल्लोन, गीतकार गुलजार, विशाल भारद्वाज, सोनू निगम, ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सूम, रजा मुराद आदी सेलिब्रिटी खय्याम यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले.
मोहम्मद जहूर खय्याम हाशमी हे खय्याम यांचे पूर्ण नाव. वयाच्या 17 व्या वर्षी संगीत साधना करणा-या खय्याम यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढऊतार अनुभवले.
कभी कभी, उमराव जान, नूरी, रझिया सुलतान, बाजार यासारख्या चित्रपटातील अविस्मरणीय संगीताने त्यांना नव्या उंचीवर नेऊन ठेवले. खरे तर खय्याम यांना संगीतकार नाही तर अभिनेता बनायचे होते. यह है जिंदगी या चित्रपटात त्यांनी भूमिकाही केली. पण पुढे ते संगीतक्षेत्राकडे वळले.
40 वर्षांच्या कारर्दिीत त्यांनी 50 वर चित्रपटांना संगीत दिले. उमराव जान या चित्रपटासाठी खय्याम यांना फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 2007 साली त्यांना संगीत नाट्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. 2010 मध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर 2011 मध्ये पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले होते.