बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंग हिने १९८३ मध्ये ‘बेताब’ या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. सनी देओल व अमृताचा ‘बेताब’ प्रचंड गाजला होता. या लव्हस्टोरीने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. अमृताच्या या यशस्वी डेब्यूनंतर सुमारे ३५ वर्षांनी तिची मुलगी सारा अली खान हिने ‘सिम्बा’ व ‘केदारनाथ’ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि या दोनचं चित्रपटांनी साराला स्टार बनवले. दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या ‘केदारनाथ’मधील साराच्या अभिनयाची प्रचंड चर्चा झाली. यानंतर आलेल्या रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’मध्ये साराने असे काही केले की ती ‘मास एंटरटेनर हिरोईन’ बनली. आता मात्र चाहत्यांना सारा आणि अमृता या दोघी मायलेकींना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्याची घाई झालीय. पण साराचे ऐकाल तर, तिला तरी हे शक्य वाटत नाहीये.
अलीकडे एका मुलाखतीत साराला आईसोबत स्क्रिन शेअर करण्याबद्दल विचारण्यात आले. यावर साराने चांगलेच मजेशीर उत्तर दिले. मला नाही वाटत, ती माझ्यासोबत काम करेल. मला वाटते, पापा माझ्यासोबत काम करू शकतात. आईने माझ्यासोबत काम केलेच तर प्रत्येक शॉटनंतर मला तिचे रागावणे ऐकावे लागेल. तिच्यासोबत काम करणे माझ्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट असेल. तिच्यासाठी तितकीच वाईट. त्यामुळे मला नाही वाटत, ती माझ्यासोबत काम करेल, असे सारा हसत हसत म्हणाली.
गेल्या काही दिवसांपासून सारा व तिचे पापा सैफ अली खान एकत्र काम करणार अशी चर्चा आहे. ‘लव आज कल 2’मध्ये सैफ व सारा एकत्र दिसणार, असे मानले जात आहे. अर्थात याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.