आपण लहान मुलांना खूप सहजपणे गोष्टी सांगतो. आता हेच बघा ना! अभिमन्यूला, ‘त्याला आई नाहीये.’ हे सांगण्यापेक्षा वडिलांनी आपल्या सोयीने ‘आई देवाच्या घरी राहायला गेली’ असे सांगितलं. यामध्ये अभिमन्यूची काय चूक आहे? तो आता आईला शोधण्याचा पाठपुरावा करतोय तर त्याचे वडील त्याला समजावून सांगण्यापेक्षा ते सांगणं टाळतायंत. आणि आता तो काहीही करून आईला शोधण्यास मदत करण्यासाठी देवाला साकडं घालतो. त्याच्या आयुष्यातील आईची जागा भरून काढण्यासाठी विठाई त्याला मदत करेल का? की तो फक्त आईच्या आभासी प्रतिमेशीच स्वमनीच्या गोष्टी करत राहील? अबडूच्या मनात नक्की काय चाललंय ते त्याने आईला लिहिलेल्या पत्रातून जाणून तरी घेऊया. ये लेका-असं म्हटलं की मी लगेच सगळा राग विसरून अण्णाबरोबर बोलतो हे त्याला चांगल ठावूक झालंय म्हणून माझ्या स्वभावाचा गैरफायदा घेतोय तो. आता आई हेच बघ, गावाला असताना म्हणाला तू देवाघरी राहायला गेलीस. आता आम्ही पंढरपुरात येऊन कितीतरी दिवस झाले, मी ‘आईला शोधायला जावूया’ रोज म्हणत असूनसुद्धा, अण्णा त्यावर काहीच बोलत नाही. मी पण ठरवलंय, आई तुझा शोध घ्यायला अण्णा जोपर्यंत मला मदत करत नाही तोपर्यंत मी त्याच्याबरोबर बोलणार नाही आणि हो, तू सापडल्यावर माझी बाजू घेऊन त्याला बोलशील हे लक्षात ठेव. बोलशील ना आई? अण्णाला झापायला तरी परत ये. माझा एक दिवससुद्धा तुझ्या आठवणीशिवाय जात नाही. आई मला समजत नाही तुला नक्की काय सांगितल्यावर तू परत येशील. आजूबाजूला लई लहान पोरांना त्यांच्या आया खेळवताना दिसतात तसं खेळवायला तरी परत ये. तुझ्या कुशीत मला डोकं खुपसून शांत झोपायचं आहे त्यासाठी तरी परत ये. गेले बरेच दिवस अण्णा लई अडचणीत आहे त्यासाठी गावपण सोडायला लागलं आपल्याला. त्याला आपण दोघं मदत करू, त्याला या संकटातून बाहेर काढू, माझ्यासाठी नको अण्णासाठी तरी परत ये. मी देवाची शपथ घेऊन सांगतो, मी तुला कधीच त्रास देणार नाही. तू फक्त परत ये. येशील ना परत? त्या दिवशी रागात अण्णा पंढरपुरात देव नाही म्हणाला. मला माहितीय माझा पांडुरंग इथेच आहे, तो कायम सोबत असतो माझ्या. आता खरी परीक्षा तर पांडुरंगाची आहे, त्याला काहीही करून मला आईला भेटवावं लागणर आहे. आता मी त्याच्याच निरोपाची वाट बघतोय. बाकी तुझी आठवण काढत मी मजेत आहे. तू फक्त लवकर परत ये. तुझी आतुरतेने वाट पाहणारा, अभिमन्यू अर्जुन मगर प्रयत्न आणि आत्मविश्वासाला जीवनाची ढाल बनवू पाहणाऱ्या छोट्या अबडू आणि त्याच्या बाबांची ही गोष्ट येत्या ३० जूनला लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित ‘रिंगण’ या चित्रपटाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. विधि कासलीवाल प्रस्तुत रिंगण या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन मकरंद माने यांचे आहेत. वडील-मुलाच्या नात्यातील हा अबोल गोडवा नक्की अनुभवा, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात.
आईला साद घालणारा अबडू
By admin | Published: June 28, 2017 3:03 AM