आज जागतिक मातृदिन साजरा केला जात आहे. या निमित्ताने अनेक सेलिब्रिटींही पोस्टद्वारे आईला मदर्स डेच्या शुभेच्छा देत आहे. आईबरोबरचे फोटो शेअर करत अनेक सेलिब्रिटींनी खास पोस्टही लिहिल्या आहेत. आईच्या आठवणीत बॉलिवूड अभिनेता संजय दत्तही भावुक झाला आहे. संजय दत्तनेनर्गिस दत्त यांचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे.
"प्रेम कसं करायचं आणि दयाळू भावनेने कसं जगायचं हे शिकवणाऱ्या महिलेला हॅपी मदर्स डे...तुझी प्रेरणा घेऊन मी जगत आहे. थँक्यू आणि लव्ह यू", असं संजय दत्तने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याची ही पोस्ट पाहून नर्गिस यांच्या आठवणीत चाहतेही भावुक झाले आहेत. चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.
नर्गिस दत्त यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला. अभिनयाबरोबरच चर्चा व्हायची ती त्यांच्या सौंदर्याची. भल्याभल्यांना भुलवेल असं त्यांचं सौंदर्य होतं. अनेक दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आणि सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर ३ मे १९८१ साली नर्गिस यांनी या जगाचा निरोप घेतला. कॅन्सरमुळे त्यांचं निधन झालं.
बालपणापासून घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालेल्या संजय दत्तने आई नर्गिस दत्त आणि वडील सुनील दत्त यांच्याप्रमाणेच अभिनयात करिअर करण्याचं ठरवलं. सुनील दत्त यांच्याशी लग्न करण्याआधी नर्गिस यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता. १९५८ साली त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त ही तीन मुले आहेत.