Join us

3 दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉलवर घेतले आईचे अंत्यदर्शन, आणि आज स्वतःच घेतली एक्झिट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 1:55 PM

तीन दिवसांपूर्वी इरफान खानने व्हिडिओ कॉलद्वारे आईचे अंत्यदर्शन घेतले होते.

बॉलिवूड अभिनेता इरफान खानच्या अचानक आलेल्या निधनाच्या वृत्तामुळे बॉलिवूडकरांना धक्का बसला आहे आणि सिनेइंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. त्याच्या अचानक जाण्याचे वृत्त त्याच्या चाहत्यांना व सहकलाकारांच्या मनाला चटका लावून गेले आहे. तीन दिवसांपूर्वीच इरफान खानची आई सईदा बेगम यांच्या निधनाचे वृत्त समोर आले होते. त्या 80 वर्षांच्या होत्या आणि लॉकडाउनमुळे त्यांच्या अंत्यदर्शनाला इरफानला जाता आले नव्हते. त्यामुळे त्याने व्हिडिओ कॉलद्वारे आईचे अंत्यदर्शन घेतले होते. त्यात आज इरफान खानच्या निधनाचे वृत्त समोर आल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. 

इरफान खानच्या आईच्या निधनाचे वृत्त त्याच्या जवळचे मित्र दिग्दर्शक शूजित सरकार यांनी सांगितले होते. ते म्हणाले होते की, इरफान खानची आई अनेक दिवसांपासून आजारी होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास जयपुरच्या आपल्या घरी घेतला.

आज इरफान खानच्या निधनाचे वृत्तदेखील शूजीत सरकार यांनी दिले. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, माझा प्रिय मित्र इरफान... तू लढत राहिलास...लढत राहिलास आणि लढत राहिलास. मला नेहमीच तुझा अभिमान वाटत राहील आणि आपण पुन्हा भेटू... श्रद्धांजली.

काल अचानक तब्येत बिघडल्यामुळे इरफानला कोकिलाबेन रुग्णालयात आयसीयूमध्ये भरती करण्यात आले होते. इरफान लवकर बरा व्हावा, यासाठी चाहते प्रार्थना करत असताना त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि चाहते शोकसागरात बुडाले. बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली

टॅग्स :इरफान खान