Join us

'बघतोस काय मुजरा कर' चित्रपटाच्या ट्रेलरचे सिंहगडावर लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2017 2:15 AM

गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या विषयाला आणि शिवाजीमहाराजांचं नाव वापरून केल्या जाणाऱ्या राजकारणाला वाचा फोडण्याचं काम बहुचर्चित 'बघतोस काय मुजरा कर'

गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या विषयाला आणि शिवाजीमहाराजांचं नाव वापरून केल्या जाणाऱ्या राजकारणाला वाचा फोडण्याचं काम बहुचर्चित 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटातून केले जाणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचं नुकतंच सिंहगडावर अनोख्या पद्धतीने लोकार्पण करण्यात आले. मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचे लोकार्पण पहिल्यांदाच गडावर करण्यात आले. 'पोस्टर गर्ल'सारखे अनेक उत्तम चित्रपट लिहिलेला अभिनेता हेमंत ढोमे 'बघतोस काय मुजरा कर' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो आहे. हेमंतनेच चित्रपटाचे लेखन केले आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट, गणराज प्रॉडक्शन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ट्रेलर लोकार्पण कार्यक्रमाला निर्माते गोपाळ तायवाडे, वैष्णवी जाधव, संजय छाब्रिया, दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे, पर्ण पेठे, नेहा जोशी, रसिका सुनील, संगीतकार अमितराज, गीतकार क्षितिज पटवर्धन, संकलक फैजल महाडिक आदी या वेळी उपस्थित होते. खास या कार्यक्रमासाठी राज्यभरातील गडकोटांच्या संवर्धनसाठी स्वयंस्फूर्तीने कार्यरत असलेल्या २२ संस्थांचे प्रतिनिधीही आले होते. 'छत्रपती शिवाजी महाराज कोणा एका जातीचे नव्हते आणि आजही नाहीत. मात्र, त्यांच्या नावाने केले जाणारे राजकारण अत्यंत चुकीचे आहे. गडकोटांच्या संवर्धनासाठी प्रत्येक मराठी तरुणाने पुढाकार घेतला पाहिजे,' असे जितेंद्र जोशीने सांगितले. 'आज अनेक तरूण आणि संस्था गडकोटांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कार्यरत आहेत. चित्रपटातील तरुण हे त्यांचेच प्रतिनिधी आहेत,' असे हेमंत ढोमेने सांगितलं. चित्रपटाच्या टीमने मशाल पेटवून गडकोट संवर्धन करणाऱ्या तरुणांच्या हाती देत ट्रेलरचे प्रतीकात्मक लोकार्पण केले.