सध्या विविध विषयांवर आधारीत कलाकृती प्रेक्षकांच्या चांगल्याच भेटीला येत आहेत. रोमँटिक, हॉरर, कॉमेडी असे विषय असणाऱ्या या कलाकृती प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी होत आहेत. ओटीटी माध्यमामुळे देशातील अनेक अज्ञात व्यक्तिमत्व आणि घटनांवर आधारीत कलाकृती लोकांच्या भेटीला येत आहेत. अशीच एक आगळीवेगळी कलाकृती रिलीजसाठी सज्ज आहे. तिचं नाव 'मूव्हिंग माऊंटन विदीन'.
'मूव्हिंग माऊंटन विदीन' डॉक्यूमेंट्रीबद्दल
७ ऑगस्ट रोजी ‘मूव्हिंग माउंटन विदीन’डॉक्यूमेंट्री रिलीज होणार आहे. धाडसी आणि उत्कट धावपटूंचं दर्शन घडवणारा, हा माहितीपट भारतातील लडाख येथे आयोजित 'ला अल्ट्रा - द हाय'च्या १० व्या सीझनची गोष्ट दाखवतो. वाळवंटासारख्या प्रदेशात जिथे सामान्य लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो आणि विविध आजारांचा सामना करावा लागतो, तिथे धावपटू १३२ तासांत ५५५ किमीचा ट्रेक करण्याचा प्रयत्न करतात. हा पराक्रम जगातील सर्वात कठीण आणि विलक्षण मॅरेथॉन प्रकार असू शकतो.
पुण्याचा ट्रेकर सहभागी
लडाखचे विलक्षण पठार आणि अस्थिर हवामान जे -१० डिग्री सेल्सिअस ते ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत तीव्रपणे बदलते. त्यामुळे एकाक्षणी ऑक्सिजन सिलेंडरशिवाय जीवघेणा धोका निर्माण होतो. ही कथा धावपटूंच्या 'नेव्हर-से-डाय' वृत्तीला सलाम करते. अनेक अडचणींचा सामना केल्यानंंतर स्पर्धकांना नवी उमेद कशी मिळते हे दाखवते. केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्या स्पर्धकांना किती आव्हानं असतात हेही यात पाहायला मिळणार आहे. डॉक्युमेंटरीमध्ये USA मधील जोडपं मॅथ्यू (५५५ किमीसाठी स्पर्धक) आणि कॅसी (२२२ किमीसाठी) सहभागी आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील पुण्याचे ४० वर्षीय धावपटू आशिष कासोदेकर (५५५ किमीसाठी) यांचाही प्रवास या माहितीपटात दिसणार आहे. जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ७ ऑगस्टला हा माहितीपट रिलीज होणार आहे.