Join us

मोगली अजूनही लोकप्रिय....'द जंगल बुक'ची ४ दिवसांत ४८ कोटींची कमाई

By admin | Published: April 12, 2016 3:37 PM

'जंगल जंगल पता चला हैं, चड्डी पहन के फूल खिला हैं' म्हणत बालपणीच्या आठवणी जागा करणा-या हॉलीवूड चित्रपट 'द जंगल बुक'ने 4 दिवसांत तब्बल 48 कोटींची कमाई केली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि, १२ - 'जंगल जंगल पता चला हैं, चड्डी पहन के फूल खिला हैं' म्हणत बालपणीच्या आठवणी जागा करणा-या हॉलीवूड चित्रपट 'द जंगल बुक'ने 4 दिवसांत तब्बल 48 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या यशामुळे मोगली हे पात्र अजूनही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असल्याचं दिसत आहे. यावर्षी रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांना 'द जंगल बुक'ने मागे सारलं आहे. 'नीरजा', 'कपूर ऍण्ड सन्स', 'वझीर' आणि 'कि ऍण्ड का' या चित्रपटांवर मोगली भारी पडला आहे. 
 
मुंबईत जन्मलेल्या रुडयार्ड किपलिंग यांचा ‘जंगल बुक’ हा जंगलकथांचा संग्रह १२० वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. त्यावर आधारित झोल्तान कोर्डा यांनी काढलेला त्याच नावाचा माहितीपट जगप्रसिद्ध असून गेल्या किमान दोन पिढ्यांच्या हृदयावर त्यातील पात्रे कोरली गेलेली आहेत. आता डिस्नी कंपनीकडून तयार केला जात असलेला ‘जंगल बुक’ हा त्याचाच पूर्ण लांबीच्या स्वरूपातील ३-डी चित्रपट आहे.
 
इतकी चांगली ओपनिंग मिळालेला 'द जंगल बुक' हा भारतातील तिसरा चित्रपट आहे. एअरलिफ्ट आणि सरदार गब्बर सिंग वगळता सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड 'द जंगल बुक'ने तोडला आहे.  रिलीजच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी चित्रपटाने 10 कोटींची कमाई केली. धमाकेदार ओपनिंग केल्यानंतर चित्रपटाने शनिवारी 13.51 कोटी आणि रविवारी 16.87 कोटींची कमाई केली. सोमवारी मात्र चित्रपटाने फक्त 7.60 कोटींची कमाई केली आहे.
'द जंगल बुक' चित्रपटाचा ट्रेंड हा काहीसा 'एअरलिफ्ट' चित्रपटाप्रमाणेच आहे. दोन्ही चित्रपटांना सारखीच ओपनिंग मिळाली आहे. 'द जंगल बुक' 3 आठवड्यांत 150 कोटींची कमाई करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मंगळवारी अनेक विद्यार्थ्यांच्या परिक्षा संपत असल्याने सुट्ट्या सुरु आहेत याचा फायदादेखील चित्रपटाला नक्कीच मिळेल. त्यामुळे येत्या आठवड्यात चित्रपट कमाईचा नवा विक्रम करु शकतो.
 
शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाला सर्व शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. सर्व ठिकाणी चित्रपट हाऊसफुल होता. हिंदी, तेलगू आणि तामिळ भाषेतील चित्रपटाने सर्वात जास्त कमाई केली आहे. शुक्रवारी महाराष्ट्रात गुढीपाडव्यानिमित्त सुट्टी असल्याने चित्रपटाला भरपूर फायदा झाला आहे. यावर्षी लहान मुलांसाठी कोणताच चित्रपट अजूनपर्यंत रिलीज न झाल्याने प्रेक्षक आपल्या मुलांसह चित्रपट पाहायला गर्दी करत आहेत. चित्रपटाला मिळणारा महत्वाचा फायदा म्हणजे तरुणदेखील चित्रपट पाहायला आतुरतेने जात आहेत. त्यामुळे 'द जंगल बुक'ला सर्व स्तरातील प्रेक्षक मिळत आहेत.  
या चित्रपटात १० वर्षांचा भारतीय वंशाचा नील सेठी मोगलीची भुमिका साकारत आहेत. या चित्रपटात नील सेठी एकमेव मानवी पात्र असून इतर सर्व पात्र ऍनिमेटेड आहेत. हिंदी चित्रपटासाठी बॉलिवूडच्या आघाडीच्या कलाकारांना आपला आवाज दिला आहे. ज्यांच्यामध्ये इरफान खान, प्रियांका चोप्रा, नाना पाटेकर, ओम पुरी आणि शेफाली शाह यांचा समावेश आहे.