बंगाली अभिनेत्री आणि टीएमसी खासदार नुसरत जहाँ(Nusrat Jahan) यांच्या लग्नाच्या बाबतीत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. नुसरत जहाँने निखील जैन(Nikhil Jain)सोबत लग्न अवैध असल्याचं म्हटलं होतं. २०१९ मध्ये तुर्कीच्या कायद्यानुसार आमचं लग्न झालं. परंतु भारतीय कायद्यात आमचं लग्न रजिस्टर केले नाही त्यामुळे ह लग्न अवैध आहे असा दावा नुसरतनं केला. त्यानंतर आता या प्रकरणावर निखील जैननेही मौन सोडलं आहे.
निखील जैन यांनी पलटवार करत म्हटलंय की, लग्नाच्या एक वर्षाच्या काळात नुसरतचं वागणं बदललं. तिने लग्नापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. गेल्या वर्षभरापासून नुसरतच्या स्वभावात बदल दिसला. २०२० मध्ये शुटींग नंतर नुसरतमध्ये हा बदल होऊ लागला. विशेष म्हणजे २०२० मध्ये यश दासगुप्ता(Yash Dasgupta)च्या SOS Kolkata सिनेमाचं शुटींग सुरू होतं. तेव्हा नुसरत आणि यशच्या अफेअरबाबत खूप चर्चा झाली. नुसरतला मी अनेकदा लग्न भारतात रजिस्टर करण्यास सांगितले मात्र नुसरतनं प्रत्येकवेळी ते टाळलं असल्याचा दावा निखीलने केला.
तसेच माझ्यावर आणि कुटुंबावर जे आरोप नुसरतकडून लावले जात आहेत त्याने मला दु:ख झालं. त्यामुळे मला हा खुलासा करावा लागत आहे. मी प्रेमात पडून नुसरतला लग्नासाठी मागणी घातली. त्यावेळी तिने आनंदात त्याला होकार दिला. जून २०१९ मध्ये तुर्कीमध्ये आमचं लग्न झालं. त्यानंतर कोलकाता येथे रिसेप्शन पार्टी ठेवण्यात आली होती. आम्ही नवरा-बायको म्हणून समाजासमोर आलोय. प्रामाणिक पती या नात्याने मी सगळंकाही नुसरत दिलं होतं. मी तिच्यासाठी काय काय केलं हे माझे मित्र, कुटुंब जाणतं. पण काही काळानंतर तिचा नवऱ्याविषयीचं मत बदलू लागलं. ऑगस्ट २०२० मध्ये एका सिनेमाच्या शुटींगनंतर तिच्या स्वभावात बदल झाला त्यामागं कारण काय हे तिला चांगलेच माहिती आहे. आम्ही एकत्र असताना मी तिला आमचं लग्न रजिस्टर करण्याबद्दल बोलत होतो मात्र ती टाळाटाळ करत होती असं निखीलनं निवेदनात म्हटलं आहे.
नोव्हेंबर २०२० मध्ये तिने बँग, किंमती वस्तू, कागदपत्रे घेऊन घर सोडलं त्यानंतर पती-पत्नी म्हणून आम्ही कधीच एकत्र राहिलो नाही. माझ्याकडे काही तिची कागदपत्रे होती तीदेखील मी तिला परत केली. मीडियात मी बातम्या पाहिल्या त्यानंतर माझा विश्वासघात झाला असं मला वाटलं. म्हणून मी ८ मार्च २०२१ रोजी अलीपूरच्या कोर्टात लग्न रद्द करण्यासाठी दावा दाखल केला. आमचं लग्न रद्द व्हावा म्हणून कोर्टात प्रकरण सुरू आहे. त्यामुळे मी वैयक्तिक खुलासे करू शकत नाही. परंतु नुसरतच्या वक्तव्यानंतर मला काही तथ्य समोर आणावी लागली. नुसरतनं होम लोन घेतलं होतं. त्याच्या व्याजातून ती वाचावी यासाठी आमच्या फॅमिली अकाऊंटवरून मी तिच्या खात्यात काही पैसे ट्रान्सफर केले होते. मी तिला प्रेमासाठी ते पैसे दिले होते परंतु तिने जो आरोप केला तो अपमानाजनक आणि खोटा आहे. त्यात जराही तथ्य नाही. माझ्याकडे बँक स्टेटमेंट आणि क्रेडिट कार्ड स्टेंटमेंट आहेत. माझ्या कुटुंबाने तिचा मुलीप्रमाणे स्वीकार केला परंतु आज हे दिवस पाहायला मिळतायेत असंही निखील जैन म्हणाले.