चार दशकांपासून बॉलिवूड आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत राज्य करणारे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते शेखर कपूर यांना कोण ओळखत नाही. शेखर कपूर यांनी बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट दिलेत. त्यांच्या मालिकाही गाजल्या. ४४ वर्षे इंडस्ट्रीत घालवणा-या शेखर कपूर यांच्याकडे आज सर्व काही आहे. नाव, पैसा, प्रसिद्धी अगदी सगळे काही. फक्त एक गोष्ट त्यांच्याकडे नाही. ती म्हणजे, स्वत:ची कार.कोट्यवधीची संपत्ती असलेल्या शेखर कपूर यांच्याकडे स्वत:ची कार नाही, हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे. अलीकडे खुद्द शेखर यांनीच याची माहिती दिली.
‘माझ्याकडे कार नाही. मुंबईत कार बाळगणे मूर्खपणा आहे. एका सामान्य आकाराच्या चारचाकीसाठी ६ लाख लीटर लागते. या पाण्याचा वापर आपल्या पिकांसाठी करता येणार नाही का?,’ असे ट्वीट त्यांनी केले. शेखर कपूर यांचे हे ट्वीट काहीच मिनिटांत व्हायरल झाले आणि चाहत्यांनी त्यावर कमेंट करणे सुरु केले.
शेखर कपूर यांनी ‘जान हाजिर है’ या चित्रपटातून अभिनेता म्हणून करिअरची सुरुवात केली होती. १९७५ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. यानंतर त्यांनी काही मालिकाही केल्यात. ‘मासूम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. शबाना आझमी आणि नसीरूद्दीन शहा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सुपरहिट ठीला. यानंतर शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपटही सुपरडुपर हिट ठरला. हा चित्रपट शेखर कपूर यांच्या करिअरमधील माईलस्टोन ठरला. सध्या ते ‘पानी’ या चित्रपटात बिझी आहेत.