Join us

"अरे, आपण राजगडाऐवजी चुकून तोरण्यावर आलो...", मृणाल कुलकर्णींनी सांगितला होता धमाल किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 11:50 AM

Shivjayanti 2024: " राजगडावर विराजसला मधमाश्या चावल्या अन्...", मृणाल कुलकर्णींनी सांगितला किस्सा

मृणाल कुलकर्णी या मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. पण त्यांनी साकारलेली राजमाता जिजाऊंची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 'राजा शिवछत्रपती' या मालिकेत त्यांनी पहिल्यांदा राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली होती. त्यानंतर 'फत्तेशिकस्त', 'सुभेदार', 'फर्जंद', 'शेर शिवराज' अशा सिनेमांमध्ये त्या जिजाऊंच्या भूमिकेत दिसल्या. मृणाल कुलकर्णींनी फत्तेशिकस्त सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला होता.  राजगडावर जायच्या ऐवजी त्या तोरणावर पोहोचल्या होच्या. आज शिवजयंतीच्या निमित्ताने हा किस्सा जाणून घेऊयात. 

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, "ऐतिहासिक चित्रपटाचं चित्रीकरण करताना नेहमीच गंमती-जमती घडत असतात. आम्ही 'फत्तेशिकस्त' चित्रपटाचं शूटिंग राजगडावर करायचं ठरवलं. एक दिवस दिग्पाल लांजेकर मला म्हणाला की, मृणालताई वास्तवात किल्ल्यावर शूटिंग करायचं का? ते ऐकून मला खूप आनंद झाला आणि मी लगेच त्याला होकार दिला. कारण, राजगड माझा अत्यंत आवडता किल्ला आहे. बालपणापासून मी अनेकदा राजगडावर गेले आहे. मी पाहिलेला पहिला किल्ला राजगड आहे. सगळ्यात भीतीदायक प्रसंग म्हणजे आमचा लेक विराजस राजगडावर गेला होता, तेव्हा तो मिन्ह्यात गेला आणि तिथे त्यांच्या संपूर्ण ग्रुपला मधमाशा चावल्या होत्या. त्यामुळे राजगड म्हटल्यावर अनेक प्रसंग डोळ्यांसमोर येतात. तिथे शूटिंग करायचं ठरल्यावर मी खूप उत्सुक होते. पहाटे तीन वाजता राजगडाच्या पायथ्याशी पोहोचायचं ठरलं. अंधारातच चढायला सुरुवात करायची आणि ऊन व्हायच्या आत पोहोचायचं म्हणजे कोणालाच त्रास होणार नाही असं ठरवलं." 

"उन्हं वरती आल्यावर लोकांना चालायची सवय नसते. पण, लोकांना किती सवय नसते याची कल्पना आम्हाला नव्हती. कारण आम्ही ठरवणारी सगळी माणसं अनेकदा किल्ल्यावर जाणारी होतो. एकेकाने चढायला सुरुवात केली आणि साधारणतः १५ मिनिटांमध्येच लोक थकायला लागली. त्यावेळी इक्वीपमेंट, ड्रेपरी, मेकअप असं सर्व घेऊन गड चढण्याची सवय नसलेल्या लोकांना किल्ल्यावर घेऊन जाणं हे खूप अवघड काम असल्याचं लक्षात आलं. काय करायचं अशा विचारात असताना वरून दिग्पाल खाली आला. आता कसं होईल याची चिंता दिग्पालला होती. ते पाहून मी म्हणाले की, आपण सर्वांनी थोडं थोडं सामान वाटून घेऊन वर जायचं. मीच असं म्हटल्यावर त्यावर कोणाला काही बोलताच आलं नाही. मग आम्ही छोटी छोटी बोचकी घेऊन किल्ल्यावर पोहोचलो. चिन्मय मांडलेकरसुद्धा पहिल्यांदाच आला होता. कॉस्च्युम डिपार्टमेंटमधल्या काही एकदम नवख्या कन्या होत्या. त्यांना मी गडावर पोहोचल्यावर म्हटलं की, अरे चुकलं आपलं... आपण चुकून तोरण्यावर आलो. आपल्याला तर राजगडला जायचं होतं. तेव्हा त्यांचे चेहरे जे काही रडवेले झाले ते पाहून आम्ही सगळे खूप हसलो, पण त्या सर्व मुलींनीही खूप एन्जॉय केलं," असंही त्यांनी पुढे सांगितलं.  

पुढे त्या म्हणाल्या, "गडावर जाणं हा निःसंशय एक वेगळा अनुभव असतो. तो इतिहास जिथे घडला तिथे जाऊन शूटिंग करायचं हा चित्तथरारक अनुभव होता. 'पावनखिंड'च्या वेळीही आम्ही असंच शूट केलं. पन्हाळ्यावर शूटिंग केलं. 'सुभेदार'च्या वेळी सिंहगडावर शूट केलं. इतकंच नव्हे तर सर्व पत्रकार मित्र-मैत्रिणींना घेऊन सिंहगडावर गेलो. तिथे त्यांची एक्साइटमेंट आणि आनंद पाहून आम्हाला धन्य झाल्यासारखं वाटलं. कारण प्रत्येकाने तो इतिहास अनुभवावा हीच आमची इच्छा आहे. आपल्या मुलांना गड-किल्ले दाखवणं आणि ऐतिहासिक स्थळांना भेटी देणं ही कुटुंबातील पालकांची जबाबदारी आहे. आमचे चित्रपट आल्यापासून लोक गड-किल्ल्यांना भेट देत असल्याचा मनापासून आनंद आहे." 

टॅग्स :मृणाल कुलकर्णीमराठी चित्रपटछत्रपती शिवाजी महाराज