उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कमपणे पाय रोवून उभी असलेली अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर (mrunal thakur). 'बाटला हाऊस', 'सुपर 30', 'लव सोनिया' अशा कितीतरी बॉलिवूड चित्रपटांमधून मृणालने तिच्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवून दिली. विशेष म्हणजे एकेकाळी छोटा पडदा गाजवणारी मृणाल आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर अनेकदा तिच्या नावाची चर्चा होत असते. यामध्येच सध्या तिच्या कॉलेजजीवनातील एक किस्सा चर्चेत आला आहे. लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्रीला एकेकाळी कॉलेजमधून बाहेर हकलवण्यात आलं होतं.
सध्या सोशल मीडियावर मृणालची एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत तिने कॉलेजमध्ये घडलेला किस्सा शेअर केला आहे. तसंच विकिपीडियावर तिच्याविषयी लिहिलेली माहिती चुकीची असल्याचंही तिने सांगितलं. सध्याच्या काळात सोशल मीडियावर सेलिब्रिटी वा दिग्गज व्यक्तींविषयी बरीचशी माहिती सहज उपलब्ध होते. मात्र विकिपीडियावर मृणालविषयी असलेली माहिती चुकीची असल्याचं सांगत तिने तिच्या शिक्षणाविषयी काही गोष्टींचा खुलासा केला.
"विकिपीडियावर माझ्याविषयी जी माहिती दिलेली आहे किंवा एडीट केलेली आहे ती चुकीची आहे. या पेजवर मी २ डिग्री घेतल्याचं सांगितलं आहे. पण, तसं अजिबात नाहीये. मुळात माझ्याकडे डिग्रीच नाहीये. कारण, मला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं होतं," असं मृणाल म्हणाली.
"कॉलेजमध्ये माझी उपस्थिती कमी असल्यामुळे मला कॉलेजमधून हकलून देण्यात आलं होतं. मी डेंटिस्ट व्हावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे मी ती परीक्षा पासदेखील झाले. मात्र, मला अभिनेत्री व्हायचं होतं. त्यामुळे मी वडिलांच्या परवानगीने पत्रकारितेच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. परंतु, अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये बिझी असल्यामुळे मला ही पदवी सुद्धा पूर्ण करता आली नाही."
दरम्यान,मृणाल अलिकडेच जर्सी या चित्रपटात झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाली. या चित्रपटानंतर मृणाल लवकरच ‘आंख मिचोली’, ‘पिप्पा’ आणि ‘गुमराह’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.