Join us

'शिवरायांचा मावळा मी भीत नाही...' अमरावतीच्या पोराचं मराठी रॅप; बादशाहचीही बोलती बंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 17:08 IST

अमरावतीचा रॅपर सौरभ अभ्यंकर उर्फ 100RBH याने शोमध्ये येत मराठी रॅप गायलं

टीव्हीवरचा लोकप्रिय शो Hustle चा सिझन 3 सुरु झाला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध रॅपर्सना त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी हा शो एक हक्काचं व्यासपीठ आहे. रॅपर बादशाह, स्क्वॉड बॉस इक्का, डी एमसी, डिनो जेम्स आणि ईपीआर हे रॅप शोचं परिक्षण करत आहेत. एमटीव्ही हसल 3.0 च्या नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये अमरावतीच्या पोरानं एन्ट्री घेतली. त्याच्या रॅपने परिक्षकांचीही बोलती बंद केली.

अमरावतीचा रॅपर सौरभ अभ्यंकर उर्फ 100RBH याने शोमध्ये येत मराठी रॅप गायलं. गाण्याचे अप्रतिम बोल आणि त्याचा दमदार परफॉर्मन्स बघून परीक्षकही प्रभावित झाले. अमरावतीचा मुलगा म्हटल्यावर बादशाहची उत्सुकता वाढलीच होती. स्टेजवर येताच जास्त न बोलता बादशाहने सौरभला लगेच रॅप सुरु करायला सांगितलं आणि सौरभने त्याच्या परफॉर्मन्सने स्टेजवर आग लावली. 'आला अमरावतीचा पोरगा, खरं खरं गाण्यात सांगतो, जे पाहिलं जे अनुभवलं, सारं गाण्यात माझ्या मांडतो; शिवरायांचा मावळा हाय मी भेत नाही पण भेवाडतो' असे त्याचे रॅपचे बोल अंगावर शहारे आणणारे आहेत.

सौरभचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात त्याचा रॅप पोहोचला आहे. युट्यूबवरही त्याचा व्हिडिओ ट्रेंड होतोय. सौरभ सोशल मीडियावर आधीपासूनच लोकप्रिय आहे. आता कार्यक्रमात तो आणखी कोणकोणते रॅप सादर करणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलंय.

टॅग्स :बादशहाएमटीव्हीअमरावती