कॉमेडियन व अभिनेता वीर दासने (Vir Das) भलेही त्याच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी माफी मागितली असो, पण अद्यापही लोकांचा राग निवळलेला नाही. आता अभिनेते मुकेश खन्ना यांनी वीर दासवर निशाणा साधला आहे. वीर दासच्या वक्तव्यावर जितक्या टाळ्या पडल्या, तितकेच चाबकाचे फटके त्याला द्यायला हवेत, अशा शब्दांत मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
मुकेश खन्ना यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात, ‘हा कॉमेडियन, जो स्वत:ला वीर दास म्हणतो, स्वत:ला खूप मोठा यशस्वी कॉमेडियन म्हणतो, त्याने कॉमेडीचं नाव बदनाम केलं आहे. विनोदाच्या दर्जावरचं त्यानं प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे. तो काय सिद्ध करू इच्छितो? त्याची इतकी हिंमत की संपूर्ण देशाविरोधात तो बोलत आहे. दुस-या देशाच्या जाऊन आपल्या देशाचे नाव खराब करतो? Washington, D.C. हॉलमध्ये जितक्या टाळ्या त्याला मिळाल्या, तितके चाबकाचे फटके त्याला पडायला हवेत. विदेशी भूमीवर देशाचा अपमान करणा-यांना धडा शिकवायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात पुन्हा कुणाची अशी हिंमत होणार नाही.’ काय आहे प्रकरणनुकताच वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘आय कम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडिओ अपलोड केला आहे. याची एक छोटी क्लीप व्हायरल झाली होती. वॉशिंग्टन डीसीमध्ये त्याच्या अलीकडील सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो,‘मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे एअर क्वॉलिटी इंडेक्स 9000 आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे मोजतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आम्ही भाजीपाला पिकवणाºया शेतकºयांवर धावून जातो.’ या व्हिडिओवरुन सोशल मीडियावर लोक त्याच्यावर जोरदार टीका करत आहेत. या टीकेनंतर वीरदासने स्पष्टीकरण दिलं होतं. देशाचा अपमान करण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. पण व्हिडीओ पूर्ण बघा. काही लोक या व्हिडीओच्या छोट्या क्लिप टाकून लोकांची दिशाभूल करत आहेत, असं त्याने स्पष्ट केलं होतं.