Join us

'सखाराम बाईंडर'मध्ये झळकणार मुक्ता बर्वे

By admin | Published: January 11, 2017 11:12 AM

अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि ललित कला केंद्रचे काही विद्यार्थी 'सखाराम बाईंडर' पुन्हा रंगभूमीवर घेऊन येत आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ -  स्त्री-पुरूष संबंधांचे करकरीत वास्तव मांडत समाजाला धक्का देणारे, विख्यात नाटटकार विजय तेंडुलकरांचे 'सखाराम बाईंडर' हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असून ताकदीची आणि तितकीच गुणवान अभिनेत्री मुक्ता बर्वे महत्वपूर्ण भूमिेकत झळकणार आहे. 
'ललित कला केंद्रा'च्या विद्यार्थ्यांचे लवकरच एक ' रियुनिअन' होणार असून त्यासाठी एक आगळी-वेगळी कल्पना साकारत हे विद्यार्थी ' सखाराम' पुढील महिन्यात पुन्हा रंगभूमीवर आणणार आहे. मातर या नाटकाचे केवळ ५ प्रयोग होणार आहेत. खुद्द मुक्ता बर्वेने सोशल नेटवर्किंग साईटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. ' तब्बल 16 वर्षांनंतर त्याच टीमबरोबर तोच काळ पुन्हा जगताना इतकं सुंदर वाटतंय. आम्ही ललित कला केंद्र मधले सगळे विद्यार्थी पुन्हा एकदा जुन्या एनर्जीनी नव्या जोमात तालिम करतोय.मस्त वाटतंय . Reunion ची ही वेगळीच कल्पना. त्याच टीमबरोबर February मधे रंगणार सखाराम बाइंडर चे ५ प्रयोग. बाकी माहिती हळुहळु सांगेनच' अशी पोस्ट मुक्ताने शेअर केली असून या नाटकात तिच्यासोबत गुणवंत अभिनेता संदीप पाठकही झळकणार आहे.
 

 
याविषयी लोकमत सीएनएक्सने संदीपशी बातचीत केली असता, या नव्या प्रयोगाबद्दल तो खूप खुश आणि उत्साही दिसला. ' मी ललित कला केंद्रामध्ये शिकत असताना आम्ही स्टुडंट्स प्रोडक्शन अंतर्गत सखाराम बाइंडर हे नाटक बसविले होते. या नाटकाचे त्यावेळी दोनच प्रयोग झाले होते. एक पुण्यात आणि दुसरा दिल्लीमध्ये. त्यावेळचा अनुभव खरंच खुप छान होता. त्यामुले पुन्हा त्याच टीमसोबत इतक्या वर्षानंतर हे नाटक करण्यासाठी मी फारच उत्सुक आहे. त्यावेळी हे नाटक करताना आम्ही अवघे २०-२२ वर्षांचे, अगदी नवखे होतो.  पण आता इतक्या वर्षात आमच्यापैकी अनेक कलाकांराची वय वाढली, विविध कामामुळे अनुभव समृद्धही झालो आहोत. आता ब-याच वर्षांनी एकत्र आल्यावर माणसं तीच असली तरी नव्या मॅच्युरिटी लेव्हलने हे नाटक पुन्हा आणण्यास आम्ही सज्ज झालो आहोत' असे संदीपने नमूद केले. 
प्रेक्षकांमध्येही या नाटकाबद्दल खूप उत्सुकता असून हे नाटक अनुभवण्यासाठीही तेही सज्ज आहेत.