Join us

मुक्ता बर्वेच्या वेडिंग शिनेमातले 'हे' गाणं ऐकलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 4:13 PM

संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

ठळक मुद्दे‘वेडिंगचा शिनेमा'तून सलील कुलकर्णी दिग्दर्शनात पदार्पण करतोय हा चित्रपट १२ एप्रिल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

संगीत दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असलेल्या ‘वेडिंगचा शिनेमा’ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दुसरे गाणे “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल फिरून पुन्हा, तिथेच का घुटमळायच, “उगीचच काय भांडायचंय? आज प्रदर्शित झाले. हे गाणे चित्रपटाचे दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी लिहिले असून त्यांनीच ते गायले सुद्धा आहे.

आपल्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आपण नेहमीच आणि उगीचच भांडत असतो, त्या भांडण्याला काही कारण पण नसते, पण उगीचच आपण सगळ्यांन बरोबर भांडत असतो. हेच या गाण्याच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.

पारंपारिक रीतीरिवाज ते आधुनिक फॅड आणि पद्धती यांचा मिलाप हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो आणि तो संपूर्ण कुटुंबासाठी उत्सवी क्षणांचा मेळावा असतो. बहुचर्चित ‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये हे सगळे पैलू भरपूर मनोरंजनाच्या मसाल्यासह प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाचा एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’च्या माध्यमातून मराठी संगीत क्षेत्रातील आघाडीचा संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी दिग्दर्शक म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे. ‘आयुष्यावर बोलू काही’मधील सलील कुलकर्णी यांचा सहकारी आणि प्रख्यात कवी संदीप खरे यांनी या चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. “उगीचच काय भांडायचंय? गोल गोल, पुन्हा पुन्हा, तेच तेच, काय बोलायचंय?...” हे गाणेही त्यातीलच एक आहे.

‘वेडिंगचा शिनेमा’मध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांच्या भूमिका आहेत, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. ‘वेडिंगचा शिनेमा’ची प्रस्तुती एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटची असून निर्मिती गेरूआ प्रॉडक्शन्स आणि पीइएसबी यांची आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटने आतापर्यंत अनेक गाजलेले मराठी चित्रपट दिले आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई-2, मुंबई पुणे मुंबई-3. बॉईज-2, बापजन्म, आम्ही दोघी, शिक्षणाच्या आयचा घो, हापूस, आयडियाची कल्पना, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरंच काही आणि टाइम प्लीज या चित्रपटांचा समावेश आहे. 

टॅग्स :वेडिंग चा शिनेमासलील कुलकर्णीमुक्ता बर्वे