प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित बहुचर्चित, काल्पनिक कथेवर आधारीत ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरु केली. विकेंड संपल्यानंतर सोमवारीही ‘मुळशी पॅटर्न’ ची जादू कायम असल्याचे बघायला मिळाले. मोठ्या शहरामधील मल्टीप्लेक्ससह छोट्या शहरात आणि ग्रामीण भागातील सिंगल स्क्रीनवर सुद्धा हा चित्रपट प्रेक्षकांची तुफान गर्दी खेचत आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचे खेड्यापाड्यातील प्रेक्षक खास चित्रपट पहाण्यासाठी वाहनेकरून जवळचे थिएटर गाठत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे, यामुळे अनेक ठिकाणी बल्क बुकिंग मोठ्या प्रमाणावर होत असून रिपीट येणारा प्रेक्षक मोठा आहे व तो कलाकारांसोबत संवाद म्हणतो. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचा विषय वास्तवाच्या जवळ जाणारा आहे, त्याची मांडणी दमदार झाली आहे. चित्रपटातील अनेक संवाद विचार करायला भाग पाडतात, कलाकारांचा अभिनय उत्तम आहे, गाणी सुंदर आहेत, तांत्रिकदृष्ट्या चित्रपट उच्चदर्जाचा आहे, समाजाला सकारात्मक संदेश देत हा चित्रपट मनोरंजन करतो अशी प्रतिक्रिया सामान्य प्रेक्षक व्यक्त करत आहेत. तसेच हा सामाजिक विषय मांडणारा चित्रपट संपूर्ण कुटुंबाने एकत्रित पहावा असे मत प्रेक्षक सोशल मिडीयावर नोंदवत आहेत.
अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स एलएलपी आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट प्रा. लि. यांची निर्मिती असलेल्या ‘मुळशी पॅटर्न’ मध्ये अभिनेता ओम भूतकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रविण विठ्ठल तरडे, सविता मालपेकर, सुनील अभ्यंकर, क्षितीश दाते, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुरेश विश्वकर्मा, दीप्ती धोत्रे, मिलिंद दास्ताने, अजय पुरकर, जयेश संघवी, अक्षय टंकसाळे, बालकलाकार आर्यन शिंदे अशी उत्तम कलाकारांची मांदियाळी चित्रपटात आहे. तर मालविका गायकवाडच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एका नवा चेहरा मिळाला आहे.