Rajat Bedi: मुंबईत अंधेरीच्या डीएन नगर परिसरात अभिनेता रजत बेदीच्या कारनं धडक दिल्यामुळे एका व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. संबंधित व्यक्तीला पालिकेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वत: रजत बेदी यानंच अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्या उपचाराचा सर्व खर्च करणार असल्याचं म्हटलं आहे. जखमी व्यक्तीचं नाव राजेश बौध असं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसंच संबंधित व्यक्तीनं मद्यपान केलं होतं अशीही माहिती समोर आली आहे.
डीएन नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मिलिंद कुर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता रजद बेदीविरोधात आयपीएल कलम २७९ आणि ३३८ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कार स्वत: रजत बेदी चालवत होता. सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता रजत बेदी घरी परतत असताना शितलादेवी मंदिराजवळ राजेश बौध अचानक रस्त्याच्या मध्ये आला आणि रजत बेदी यांच्या कारची धडक बसली. यात संबंधित व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रजत बेदीनं स्वत: जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं असून त्यानंतर ते पोलीस ठाण्यात आले आणि घडलेल्या घटनेची माहिती आम्हाला दिली. अपघातग्रस्त व्यक्ती बेशुद्धावस्थेत असून अपघाताची तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे. अद्याप कोणतीही अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही", असं डीसीपी संग्रामसिंह निशंदर म्हणाले.