Cruise Ship Drugs Party: क्रुझ पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा लेक आर्यन खानला (aryan khan) अटक झाल्यापासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. सध्या या प्रकरणाला नवीन वळण लागलं असून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक सातत्याने पत्रकार परिषद आणि ट्विटरच्या माध्यमातून समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. समीर वानखेडे यांनी फसवेगिरी करुन कशा पद्धतीने नोकरी मिळवली हे नवाब मलिक यांनी बऱ्याचदा सांगितलं आहे. त्यामुळे सध्या हा वाद चांगलाच चिघळला आहे. यामध्येच मराठी अभिनेत्री मेघा धाडे हिने समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे. चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जातीये अशी कडाडून टीकाही तिने केली आहे.
" नमस्कार मी मेघा धाडे. आज मी कोणतीही मनोरंजन विश्वातील माहिती देण्यासाठी किंवा अवांतर चर्चा करण्यासाठी आलेले नाही. तर आज मला जाणून घ्यायचंय की, आपल्याला कसा समाज हवाय? आपल्याला अशी सोसायटी हवी आहे का जिथे एक माणूस सत्यासाठी उभा आहे. जो समाजातील वाईट प्रवृत्तींना संपवण्यायचा प्रयत्न करतोय. पण, तीच वाईट प्रवृत्ती असलेले काही समाज कंटक त्याच्या पाठी लागले आहेत. त्याचा मानसिक छळ करतात. त्याच्या कर्तव्य दक्षतेवर,चारित्र्यावर शिंतोडे उडवतात. जर हे असं असेल तर मग अशा समाजात आपण स्वत: ही सुरक्षित नाही. जे न्यायाची, आपली सुरक्षा करतात त्यांच्याच वाट्याला एवढी विटंबना येत असेल. तर, एक सामान्य माणसाचं जगणं कसं असू शकतं या समाजात? मी आज एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्याविषयी बोलायला आले. ज्यांच्या नावाची गेल्या काही दिवसात खूप चर्चा आहे. एक कर्तव्य दक्ष म्हणून त्यांची जी ख्याती आहे. त्याच्यावर आज कोणी तरी शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करतंय हे खरंच खूप संताप आणणारं आहे. अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांना वेठीस धरलं जातंय," असं मेघा म्हणाली.
खोटी माहिती देणारा आपला नेता कसा? नवाब मलिकांचं नाव न घेता megha dhade ची टीका
पुढे ती म्हणते, "आता मी त्यांच्या वडिलांचा व्हिडीओ पाहिला जे स्वत: एक कर्तव्यदक्ष पोलिस होते. ते एका मुलाखतीत त्यांची जात, धर्म यांचं सर्टिफिकेट दाखवत होते. मला इतका संताप आला. तुम्ही चोर सोडून संन्याशाला फाशी देताय. जे समाज कंटक हे सगळं करतायेत ते कोण आहेत हे न समजण्याइतके आपण नासमज नाही. जे या सगळ्या वाईट गोष्टींमध्ये आहेत ते मुद्दाम या माणसाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची जात, धर्म, लग्न, त्यांची दिवंगत आईचा धर्म या सगळ्या गोष्टी खोदून काढून त्या माणसाला त्रास दिला जातोय. मला सांगा एवढा मोठा ऑफिसर केवळ ८ कोटींच्या खंडणीसाठी असं करेल का?. खंडणी शब्द त्यांच्यासोबत जोडला जाणंच चुकीचं आहे. जो अरबो रुपये कमवू शकतो तो काही कोटींसाठी असं करेल का?. अशा ऑफिसरवर असे आरोप लागत असतील तर मग आपल्या सारख्या सामान्य लोकांनी काय करायचं."
दरम्यान, मेघाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने अनेक गोष्टींवर भाष्य केलं आहे. इतकंच नाही तर तिने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अप्रत्यक्षरित्या टोलादेखील लगावला आहे.