मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी अटकेत (Aryan Khan Mumbai Cruise Drugs Case)असलेला लेक आर्यन खानला (Aryan Khan) भेटायला शाहरूख खान (Shah Rukh Khan) आज सकाळी मुंबईच्या आर्थर रोड तुरूंगात पोहोचला. मीडियाच्या आणि चाहत्याच्या गर्दीतून वाट काढत, शाहरूख तुरुंगाच्या गेटपाशी पोहोचला आणि मग आर्यन भेटण्यासाठीच्या बराकीत. आर्यन व शाहरूख यांच्यात काय बोलणं झालं हे कळू शकलेलं नाही. पण ही भेट कशी झाली, ते मात्र समोर आलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख व आर्यन बापलेकांची सुमारे 15 मिनिटं भेट झाली. अलीकडे शाहरूख होता तर पलीकडे आर्यन आणि दोघांच्या मध्ये काचेची भिंत होती. दोघेही इंटरकॉमच्या मदतीने एकमेकांशी बोलले. जेलचे अधिकारी यावेळी हजर होते. आर्यनला पाहताच शाहरूख प्रचंड भावुक झाला. आर्यनची अवस्थाही वेगळी नव्हती.
ग्रे कलरचा टी-शर्ट, तोंडावर मास्क, डोळ्यांवर गॉगल घालून शाहरूख तुरुंगातच्या आत जाताना दिसला. यावेळी शाहरूखला कोणतीही विशेष सुविधा देण्यात आली नव्हती. सामान्य नागरिकासारखा तो आला आणि मुलाला भेटून निघून गेला. काही दिवसांपूर्वी शाहरूख व गौरी खान यांनी आर्यनशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला होता. त्याआधी एनसीबीच्या कोठडीत असताना आर्यन व शाहरूख यांचा केवळ दोन मिनिटांचा फोनवरून संवाद झाला होता.
इतक्या दिवसानंतर का भेटला17 दिवसानंतर शाहरूख खान आर्यनला भेटला. याचे कारण म्हणजे, कोव्हिड महामारीमुळे महाराष्ट्रातील तुरुंगातील कैद्यांच्या भेटीवर बंदी लादण्यात आली होती. काल बुधवारीच महाराष्ट्र सरकारने ही बंदी उठवली आणि या निर्णयाचा फायदा घेत आज दुस-याच दिवशी शाहरूख आर्यनला भेटायला तुरूंगात पोहोचला. काल आर्यनचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. यानंतर आर्यनच्या वकीलांनी मुंबई उच्चन्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. शाहरूख व गौरी दोघेही लेकाला जामीन मिळावा यासाठी प्रयत्न करत आहेत. पण अद्यापतरी त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. ‘आज तक’ने तुरूंगातील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, जामीन रद्द होताच आर्यन खान प्रचंड अस्वस्थ झाला. यानंतर तो आपल्या बराकीत चुपचाप एका कोपºयात जावून बसला. तेव्हापासून तो शांत आहे. कोणाशीही तो बोलत नाहीये.