Join us

Mumbai: फटाका सायलेन्सरवर पोलिसांकडून थेट रोलर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 2:17 PM

Traffic: मुंबईत फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, कर्णकर्कश आवाज करीत सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी मुंबई  पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

 मुंबई : मुंबईत फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, कर्णकर्कश आवाज करीत सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी मुंबई  पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. मुंबईत कारवाई करण्यात आलेल्या वाहनांचे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले. संबंधित वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या लाखोंच्या फटाका सायलेन्सरवर पोलिसांनी थेट रोलर फिरवत ते नष्ट केले.

पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही काही हौशी वाहनधारकांकडून फटाका, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरले जात आहेत. याबाबत मुंबई वाहतूक पोलिस आणि विविध पोलिस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईनंतरही काही वाहनधारक मूळ सायलेन्सर वापरत नसल्याचे दिसून आले. अखेर काही महिन्यांत मुंबई वाहतूक  पोलिसांनी विविध मार्गांवर वाहन तपासणी करून फटाका (मॉडिफाय) सायलेन्सर जप्त केले. या जप्त केलेल्या सायलेन्सरबरोबरच त्या-त्या वाहनधारकांना हजारो रुपयांचा दंडही करण्यात आला. काहींवर थेट न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे. सण-उत्सव काळात काढण्यात येणाऱ्या दुचाकी रॅलीत अशा फटाका सायलेन्सर असलेल्या दुचाकींचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे आढळून आले आहे. पोलिस अशांवर तातडीने कारवाई करीत आहेत. मात्र, काही वाहनधारक पोलिसांच्या या कारवाईला जुमानत नसल्याने पोलिसांनी आता धडक मोहीम होती घेतली आहे. 

महिनाभरात तब्बल हजारो  सायलेन्सर जप्त केले आहेत. मुंबई  पोलिसांनी जप्त केलेल्या सायलेन्सरवर काही महिन्यांपूर्वी  रोलर फिरवत ते नष्ट केले. डांबरी रस्त्यावर एका ओळीत सायलेन्सर ठेवून त्यावरून रोलर फिरविण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने फटाका सायलेन्सर वापरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिरवणूक, दुचाकी रॅलीसह  फटाका सायलेन्सर वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. 

वाहनांत बदल, हजाराचा फटका मुंबईत फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मोटार वाहन कायदा १९८ अंतर्गत अनधिकृतपणे वाहनात बदल केल्यामुळे एक हजार रुपयांचा दंड आकारला जात आहे.

टॅग्स :वाहतूक कोंडी