मुंबई : सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शनमध्ये अटक झालेल्या रिया चक्रवर्तीला आज मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला. न्यायालयाने आज तिला जामीन मंजूर केला. यामुळे ती तब्बल एक महिन्यानंतर कारागृहातून बाहेर येणार आहे. यावेळी माध्यमांनी तिचा पाठलाग करू नये, अशी सूचना मुंबई पोलिसांनी केली आहे. अन्यथा मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन जप्त करण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.
मुंबई पोलिसांनी म्हटले आहे, “कोणत्याही प्रकारचा पाठलाग, अडवणूक किंवा रस्त्यावर सिग्नलला गाडी उभी असताना जाऊन त्यांची मुलाखत घेणे अथवा चित्रिकरण करणे कायद्यानं गुन्हा आहे. यातून तुम्ही स्वत:चे तसंच रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे जीव धोक्यात घालत असता. याबाबत मुंबई पोलीस अतिशय कडक कारवाई करणार आहे. चालकच नव्हे तर त्याला जो सूचना देत असेल अथवा तसे करण्यास प्रवृत्त करत असेल, त्याच्यावरही कारवाई केली जाईल.”
"कोणत्याही प्रकारे पाठलाग आणि अडवणुकीला प्रोत्साहन देऊ नका. नियमांचे उल्लंघन होत असल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गंत वाहन जप्त करण्याचा अधिकार आहे. ही कडक कारवाई असेल,' असेही मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.
रियाला ड्रग्ज प्रकरणात 8 सप्टेंबरला एनसीबीने अटक केली होती. मुंबई उच्च न्यायलयाने रिया चक्रवर्तीसह, सॅम्युल मिरांडा आणि दिपेश सावंत यांना जामीन मंजूर केला आहे. रियाला 1 लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन देण्यात आला असून पुढील 10 दिवस 11 ते 5 या वेळेत रियाला जवळील पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, शौविक चक्रवर्ती आणि अब्देल परिहार यांना जामीन देण्यास न्यायलयाने नकार दिला आहे.
रियाला होऊ शकते 10 वर्षांची शिक्षा -एनसीबीने म्हटले आहे, की समाजाला विशेषतः तरूणांना हे समजावण्याची आवश्यकता आहे, की त्यांनी अमली पदार्थांच्या सेवनापासून दूर रहावे. त्यांनी असे केल्यास त्यांनाही अशाच प्रक्रियेला सामोरे जावे लागेल. 8 सप्टेंबरला एनसीबीने बरीच चौकशी केल्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक केली होती. या प्रकरणात रिया चक्रवर्ती दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एनसीबी ड्रग्स अँगलचा तपास करत आहे. एनसीबीला या तपासात पुरावे हाती लागले आहेत. आतापर्यंत एनसीबीने 17 जणांना अटक केली आहे