भारतात गांजा वैध ठरवण्यात आला पाहिजे असे बेताल मत व्यक्त करणाऱ्या उदय चोप्राचा मुंबई पोलिसांनी चांगलाच समाचार घेतला. उदय चोप्राने भारतात गांजा वैध करण्याचा सल्ला दिला होता. केवळ इतकेच नाही तर असे केल्यास होणारे फायदेही सांगितले होते.हा एक महसूल मिळवण्याचा मोठा स्त्रोत होऊ शकतो आणि वैद्यकिय क्षेत्रातही याचे फायदे आहेत, असे तो म्हणाला होता.‘ भारतात गांजा वैध केला पाहिजे, असे मला वाटत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा आपल्या संस्कृतीचा एक घटक आहे. याला जर वैध ठरवण्यात आले आणि त्यावर कर बसवला तर हा महसूल मिळवण्याचा मोठा स्रोत ठरू शकतो. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, याचे खूप काही वैद्यकीय लाभ आहेत,’ असे ट्विट त्याने केले होते. उदयच्या या ट्विटनंतर मुंबई पोलिसांनी त्याचा खरपूस समाचार घेतला आहे. केवळ इतकेच नाही तर अगदी नम्र शब्दात त्याला द्यायची ती ताकिदही दिली आहे. ‘सर, भारतीय नागरिक या नात्याने तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच. पण हे लक्षात असू द्या की, गांजाचे सेवन, त्याचा व्यापार आणि त्याचा पुरवठा केल्यास १९८५च्या नार्कोटिक ड्रग्ज अॅण्ड सायकोट्रोपिक सबस्टंस अॅक्ट’अंतर्गत कठोर शिक्षेची तरतूद आहे,’ असे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.
उदय चोप्राच्या ‘त्या’ बेताल ट्विटचा मुंबई पोलिसांनी घेतला खरपूस समाचार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 10:53 AM