‘मुंबई पुणे मुंबई-३’मध्ये गौतम आणि गौरी यांच्या आयुष्याच्या प्रवाही वाटचालीची कथा आहे. पहिल्या भागात हे दोघे भेटले होते. दिग्दर्शक सतीश राजवाडेने अगदी साधी आणि अपेक्षित मार्गाने जाणारी कथा अगदी सुंदररित्या साकारली आहे. एखादि साधी कथा अधिक सुलभतेने कशी सांगावी, हे सतीशकडून शिकावे, असे उद्गार मुक्ता बर्वेने काढले आहेत.
अभिनेत्री मुक्ता बर्वे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहे. ‘मुंबई पुणे मुंबई’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागात ती गौरीच्या भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांचे आहे तर एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटचे संजय छाब्रिया निर्माते आहेत. 52 फ्रायडे सिनेमाजचे अमित अमित भानुशाली चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. तीन भागांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
मुक्ताने सतीशबरोबर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे पण तरीही ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा तिच्यासाठी सर्वात भावनिक चित्रपट आहे. “टेलिव्हिजन आणि चित्रपटातील माझ्या कारकिर्दीचा विचार करता सर्वाधिक काम मी सतीशबरोबर केले आहे. आम्ही अजून रंगभूमीवर एकत्र काम केलेले नाही. ‘मुंबई पुणे मुंबई’चा हा प्रवास आठ वर्षांपूर्वी सुरू झाला. यातील कलाकार आणि तंत्रज्ञ असे आम्ही सर्वाचजणांनी हा प्रवास एकत्र केला आहे. मी सतीशबरोबर आणि स्वप्नील जोशी बरोबर अगदी पारदर्शकपणे आणि बेधडकपणे वागू शकते आणि तसेच त्याचेही वागणे असते,” असेही मुक्ताने म्हटले आहे.
ती पुढे म्हणते की, डोहाळजेवणाच्या चित्रपटातील दृश्याच्या वेळी तिला दिग्दर्शकाने भरपूर छळले. सर्वचजण माझ्याशी संपूर्ण चित्रपटात चांगले वागले, पण या दृश्यात मात्र त्या सर्वांनीच मला पार वेडे करून सोडले.
‘मुंबई पुणे मुंबई-३ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, प्रशांत दामले, सविता प्रभुणे, सुहास जोशी, मंगल केंकरे आणि विजय केंकरे हे मराठीतील लोकप्रिय कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत
मुंबई पुणे मुंबई’ हा चित्रपट बरोब्बर आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुपरडूपर हिट ठरला. या चित्रपटाचा पुढचा भाग ‘मुंबई पुणे मुंबई-२’ दोन वर्षांपूर्वी आला आणि त्यावेळीही यशाच्या इतिहासाची पुनरुक्ती झाली. आता चित्रपटाच्या तिसऱ्या म्हणजे ‘मुंबई पुणे मुंबई ३’च्या माध्यमातून ही यशोगाथा पुन्हा साकार होणार आहे. सतीश राजवाडे यांच्या दिग्दर्शनासह ‘मुंबई पुणे मुंबई ३’मध्ये स्वप्नील जोशी-मुक्ता बर्वे जोडी पुन्हा एकदा रसिकांसमोर आली आहे.