Anupam Kher : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर हे नुकतेच एका दरोड्याला बळी पडले. दोन दिवसांपूर्वी चोरट्यांनी मुंबईतीलअनुपम खेर यांचे कार्यालय फोडून चोरी केली. चोरट्यांनी त्यांच्या कार्यालयात प्रवेश करुन रोख रक्कम आणि फिल्म निगेटिव्ह असलेली तिजोरी चोरली. त्यानंतर या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी चोरीप्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच या चोरट्यांबाबतही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरीतील कार्यालयात २० जून रोजी चोरी झाली. चोरट्यांनी खेर यांच्या कार्यालयातून रोख चार लाख पंधरा हजार रुपये आणि ‘मैने गांधी को क्यू मारा’ या फिल्मचे रिल चोरून नेले. अनुपम खेर यांनी याप्रकरणाची माहिती त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन दिली होती. त्यानंतर अंबोली पोलिसांनी दोघांना अटक केली. चोरट्यांकडून पोलिसांनी रोख ३४ हजार रुपये व फिल्मची रिल हस्तगत केली आहे.
गुरुवारी अभिनेते अनुपम खेर यांनी एक पोस्ट आणि व्हिडिओ शेअर केला होता. "काल रात्री दोन चोरट्यांनी वीरा देसाई रोडवरील माझ्या कार्यालयाचे दोन दरवाजे तोडून संपूर्ण तिजोरी आणि आमच्या कंपनीने तयार केलेल्या चित्रपटाचे निगेटिव्ह जे एका बॉक्समध्ये होते ते चोरून नेले. एफआयआर नोंदवल्यानंतर पोलिसांनी लवकरच चोराला पकडण्याचे आश्वासन दिले आहे कारण दोघेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सामानासह ऑटोमध्ये बसलेले दिसले. पोलिस येण्यापूर्वी मी हा व्हिडिओ बनवला होता," असे अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.
अनुपम खेर यांनी एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली. त्यांची नावे माजिद शेख आणि मोहम्मद दलेर बहरीम खान अशी आहेत. पोलिसांनी सांगितले की ते सराईत चोर आहेत. दोघेही शहरातील विविध भागात फिरून रिक्षा चोरी करतात. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांनीच अनुपम खेर यांच्या कार्यालयात चोरी केल्याचे समोर आले आहे. त्याच दिवशी मुंबईतील विलेपार्ले परिसरातही चोरी झाली होती. दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडून लोखंडी तिजोरीही हस्तगत केली.