Join us

Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 11:41 AM

Munjya Box Office Collection: जाणून घ्या, 'मुंज्या'ची १० दिवसांतली कमाई, आकडे पाहून व्हाल थक्क

Munjya Box Office Collection सध्या कलाविश्वात आणि बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या' या सिनेमाने तुफान धुमाकूळ घातला आहे. शर्वरी वाघ हिची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई करत असून या सिनेमाने अवघ्या १० दिवसात जवळपास सगळेच रेकॉर्ड तोडले आहेत. इतकंच नाही तर या सिनेमाने कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन', अजय देवगणचा 'मैदान' या सिनेमांनाही मागे टाकलं आहे.

'मुंज्या' हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरला होता. या सिनेमाच्या ट्रेलरने प्रचंड धुमाकूळ घातला होता. जबरदस्त व्हीएफएक्स, भयावह सीन यांच्यामुळे या सिनेमाची प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली होती. विशेष म्हणजे हा सिनेमा बिग बजेट किंवा बिग स्टार नसतांनाही फक्त त्यांच्या कथानकाच्या जोरावर बॉक्स ऑफिस गाजवत आहे.

१० दिवसांत 'मुंज्या'ची कमाई

मुंज्याने रिलीजच्या पहिल्या दिवशी ४ कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी ७.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी ८ कोटी, चौथ्या दिवशी ४ कोटी, पाचव्या दिवशी ४.१५ कोटी,सहाव्या दिवशी ४ कोटी आणि सातव्या दिवशी ३.९ कोटी रुपयांची रग्गड कमाई केली आहे.  

मुंज्याने एकाच आठवड्यात ३५.३ कोटींची कमाई केली असून दुसऱ्या शुक्रवारी ३.५ कोटींची आणि शनिवारी ६.५ कोटींची कमाई केली. सॅकनिल्कच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, मुंज्याने रिलीजच्या दुसऱ्या रविवारी म्हणजेच १० व्या दिवशी ८.५० कोटींचं कलेक्शन केलं आहे. त्यामुळे या सिनेमाचं आतापर्यंतचं एकूण कलेक्शन ५३.८० कोटी रुपये इतकं झालं आहे.

'मुंज्या'ने केलं 'मैदान'ला चितपट

एप्रिल आणि मे महिन्यात बॉक्स ऑफिसवर कोणतेही सिनेमा फारसे गाजले नाहीत. यामध्येच जूनमध्ये मुंज्याने बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं आहे. या सिनेमाने अजय देवगणच्या मैदान या सिनेमाचं लाइफटाइम कलेक्शन मोडलं आहे. मैदानचं लाइफटाइम कलेक्शन ५३.०३ कोटी रुपये होतं. आणि, मुंज्याने अवघ्या १० दिवसात ५३.८० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा सिनेमा लवकरच १०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आदित्य सरपोतदार दिग्दर्शित मुंज्या या सिनेमात शर्वरी वाघ हिने मुख्य भूमिका साकारली आहे. तर, अभय वर्मा, सत्यराज, सुहास जोशी, मोना सिंह हे कलाकार मंडळी झळकले आहेत.

टॅग्स :बॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाअजय देवगण