Join us

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : बबीताजीची मालिकेतून एक्झिट? वाचा, मुनमुननं काय दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 11:29 AM

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : बबीताजी अर्थात मुनमुन दत्तानं मालिका सोडण्याच्या चर्चा सुरू होताच, चाहते हिरमुसले होते. पण आता शो सोडण्याच्या चर्चेवर खुद्द मुनमुनने खुलासा केला आहे.

ठळक मुद्देगेल्या महिन्यात अभिनेत्री मुनमुन दत्ता एका व्हिडीओमुळे वादात अडकली होती.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील प्रत्येक कलाकारानं आताश: प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. साहजिकच यापैकी कोणी मालिका सोडणार म्हटलं की, प्रेक्षक निराश होतात. दयाबेन अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी गेली ती अद्याप शोमध्ये परतलेली नाही. पाठोपाठ अंजली भाभी आणि हरजीत सिंह लोढी यांनीही शोला रामराम ठोकला. अशात बबीताजी अर्थात मुनमुन दत्ताही (Munmun Dutta) शोला अलविदा म्हणणार असल्याच्या चर्चा सुरू होताच, चाहते हिरमुसले होते. पण आता शो सोडण्याच्या चर्चेवर खुद्द मुनमुनने खुलासा केला आहे. शो सोडणार असल्याची चर्चा अफवा असल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे.

 मूनमून दत्ता गेल्या काही दिवसांपासून शूटिंगसाठी सेटवर आलीच नाही त्यामुळे तिनं मालिका सोडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अगदी मूनमून नाही तर नवी बबीता कोण? इथपर्यंत चर्चा रंगल्या होत्या. अखेर मुनमुनला स्वत: यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. ई टाइम्सशी बोलताना ती म्हणाली, ‘गेल्या दोन-तीन दिवसांत माझ्याबद्दल अनेक खोट्या बातम्या पसरल्या. त्याचा माझ्या खासगी आयुष्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. मी ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या सेटवर दिसले नाही, अशी चर्चा सुरू झाली. हे धादांत खोटं आहे. सत्य तर हे आहे की शोच्या कथानकामध्ये माझ्या व्यक्तिरेखेची गरजच नव्हती त्यामुळे मला शूटिंगला बोलवलंच नव्हतं. आता जर मला बोलवलंच नसेल तर मी जाऊन रिपोर्ट करणं गरजेचं नाही. कथानकात पुढे काय घडणारा याचा निर्णय प्रॉडक्शनची टीम ठरवते. तो निर्णय माझा नसतो. मी फक्त प्रॉडक्शन टीम आणि दिग्दर्शक सांगतील तेवढं  करते आणि परत घरी येते. कथानकात माझ्या भूमिकेची गरजच नसेल तर मी शूटिंग करणार नाही, असं ती म्हणाली

 

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने मला टीव्ही जगतात ओळख निर्माण करून दिली आहे. माझा एक खास चाहता वर्ग आहे. मी मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो चाहत्यांना सांगणं ही माझी जबाबदारी आहे आणि सत्य जाणून घेणं त्यांचा अधिकार आहे. जर मी तसा निर्णय घेतला तर  स्वत: माध्यमांना ती बातमी देईन, असंही ती म्हणाली.

गेल्या महिन्यात  मुनमुन दत्ता एका व्हिडीओमुळे वादात अडकली होती. या प्रकरणात तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली होती. इतकंच काय तर या प्रकरणामुळे तिच्यावर पोलिस कोठडीत सुद्धा जाण्याची वेळ आली होती. त्यानंतर मुनमुन दत्ताने तो व्हिडिओ काढून टाकला होता. तसंच तिच्या चुकीबद्दल क्षमा मागितली होती. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मा