साहित्य, संगीत, कला, अभिनय, नाटक, चित्रपट, कथाकथन, प्रवासवर्णन अशा अनेक प्रकारात महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेल्या अष्टपैलू पु.ल.देशपांडे यांनी बेमालूमपणे मुशाफिरी केली. पुलंच्या लेखणीने निखळ आनंद तर दिलाच पण दर्जेदार विनोद, त्यातील मर्म आणि एक संदेश देण्याचे कामही केले. व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ यांसह त्यांनी लेखणीतून निर्माण केलेली अनेक पात्रे आजही स्मरणात राहतात आणि त्या पात्रांचे केवळ नाव घेतले तरी पटकन चेहऱ्यावर हसू उमटते. मराठी भाषा आणि साहित्यात अनेक लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार, लोककला सादर करणारे कलाकर, शाहीर, साहित्यिक होऊन गेले. आपापल्या दर्जेदार, कसदार लेखणीतून त्यांनी समाजाला, भाषेला आणि साहित्याला अविट गोडीचे भांडार दिले. शिवाय समाजप्रबोधन केले.
विविधतेने नटलेल्या मराठी साहित्याची सफर एकाच ठिकाणी अनुभवायला मिळावी, असा एक ‘शहाणा’ प्रयोग रंगभूमीवर सादर केला जात आहे. तो म्हणजे ‘मुशाफिरी’. पु.ल.देशपांडे यांच्या अंतु बर्वा, सखाराम गटणे, हरितात्या, पेस्तन काका, नंदा कामत यांच्या साक्षीने मराठी साहित्याची सफर घडवणारा हा आगळावेगळा प्रयोग आहे. नवरसांचा प्रत्यय देणारा हा प्रवास मराठी साहित्यातील कथा, पोवाडा, लावणी, बतावणी, भारूड, कविता, नाट्यप्रवेश असे अनेक प्रकार घेत पुढे जातो. बहुतांश मंडळी युवापिढीतील असल्याने उत्तम सादरीकरणासोबत मराठी साहित्याचा वसा तरुणांच्या माध्यमातून पुढे जात असल्याचे समाधान मिळते.
Instagram Live वर संकल्पनेचे सादरीकरण ते रंगभूमीवरील नाट्यविष्कार
‘मुशाफिरी’चा दिग्दर्शक आणि अभिनेता ऋग्वेद फडके याने ‘लोकमत’शी बोलताना आपल्या नाटकाबाबतचे विविध पैलू सांगितले. दर्जेदार साहित्य, नाट्य, लोक-भाव संगीताची ही एक अनोखी मैफिल आहे. पु.ल.देशपांडे यांना मध्यवर्ती ठेवून ही मैफिल प्रेक्षकांसमोर सादर केली जाते. आजचा काळ सोशल मीडियाचा आहे. एका Instagram Live च्या माध्यमातून ही संकल्पना आधी केली होती. तेव्हा उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद मला मिळाला. ते करतानाही खूप मजा आली. एक वेगळा प्रयोग या निमित्ताने करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर एक क्षण विचार केला की याचा एक सुंदर नाट्यविष्कार नक्कीच होऊ शकतो. मग लगेच या नाटकाची लेखिका ईश्वरी अतुल यांना फोन केला. मला सुचलेला विषय आणि संकल्पनेबाबत सांगितले. तिलाही माझी संकल्पना प्रचंड आवडली आणि ‘मुशाफिरी’चा प्रवास सुरु झाला.
‘मुशाफिरी’ची टीम मोठी आहे. ही टीम कशी बांधली, याबाबत बोलताना ऋग्वेद फडके म्हणाला की, ज्यावेळेस हा विषय सुचला त्यावेळेस मला ठाऊक होते की हा विषय काय एकट्याने पेलण्याचा नाही, आपल्याला यात एकाची हमखास मदत लागणार आहे. एकाबाजूला ईश्वरी अतुल यांच्याशी बोलणे सुरूच होते. त्यात स्वानंद केतकर आणि अक्षता आपटे यांची याची भेट झाली. तसेच रोहन देशमुख हा मित्र होताच, ज्याने संगीत संयोजनाची बाजू समर्थपणे सांभाळली. आमच्या एकमेकांच्या ओळखीतून आणि कॉलेजच्या नाटकाच्या ग्रुपमधून आम्ही ही टीम उभी केली. यातील बरीच मंडळी एकमेकांना बरीच वर्ष ओळखतात आणि एकत्र कामही करतात. त्यामुळे टीम बॉडिंग उत्तम झाले आणि नाटक सादर करताना याचा फायदा होतो.
अलीकडेच नाट्यविष्काराला एक वर्ष पूर्ण झाले. टीम मोठी असल्यामुळे आणि सर्वांच्या वेळा तसेच अन्य गोष्टी सांभाळत वर्षभरात या नाटकाचे अनेक प्रयोग राज्यभरातील विविध ठिकाणी सादर करण्यात आले. प्रत्येक प्रयोगाचा अनुभव वेगळा होता. तर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आपलेपणा मिळाला. पारंपारिक गद्य आणि पद्य असलेल्या या सादरीकरणाशी प्रेक्षक एकरूप होऊन जातात. अनेकदा सादरीकरणारांना वन्समोअरही मिळतो. सुनील बर्वे, सुप्रिया पिळगांवकर, सीमा देशमुख, श्रीरंग देशमुख यांसारख्या अनेक सेलिब्रेटिंनीही हे नाटक पाहिले आहे. ‘दैदीप्यमान मराठी साहित्याचा जागर करणारा उदोयन्मुख तरुण रंगकर्मींनी केलेला आगळावेगळा प्रयोग आणि पुन्हा पुन्हा बघावा’, असा लक्षवेधी नाट्यविष्कार या शब्दांत या सेलिब्रेटिंनी कौतुक केले आहे. यापुढे अधिकाधिक प्रयोग करण्याचा मानस ऋग्वेद फडके याने बोलून दाखवला आहे.