बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार म्हणून अभिनेता राजेश खन्नाकडे (Rajesh Khanna) पाहिलं जातं. राजेश खन्नाने जो स्टारडम मिळवला तो आजतागायत कोणत्याही अभिनेत्याला मिळालेला नाही. १९६६ मध्ये इंडस्ट्री पदार्पण करणाऱ्या राजेश खन्ना यांनी काका म्हणून बरीच लोकप्रियता मिळवली. आपल्या सिनेमात त्यांना घेण्यासाठी दिग्दर्शक, निर्माते त्यांच्या दारापुढे रांगा लावत होते. परंतु, एक काळ असा आला होता जेव्हा कलाविश्वाने त्यांच्याकडे पाठ फिरवायला सुरुवात केली होती. बॉलिवूड अभिनेता मुश्ताक खान यांनी अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे.
अलिकडेच मुश्ताक खान (Mushtaq khan) यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांचं करिअर आणि एकंदरीतच त्यांच्या बॉलिवूड प्रवासाविषयी भाष्य केलं. यात त्यांनी राजेश खन्ना यांचा स्टारडम हळूहळू कसा कमी होत गेला हे सांगितलं. डिजिटल कॉमेंटरी या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे.
नेमकं काय म्हणाले मुश्ताक खान?
"राजेश खन्ना यांच्या शेवटच्या काळात त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं. सिनेसृष्टीतील कोणीही त्यांच्या पाठिशी उभं राहिलं नव्हतं. राजेश खन्ना लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मी त्यांच्यासोबत काम केलं होतं. त्यावेळी सगळं चित्र वेगळं होतं. पण, त्यानंतर मी जेव्हा पुन्हा त्यांच्यासोबत काम केलं त्यावेळी माझा या सगळ्यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांना कुणीही पूर्वीसारखं मान देत नव्हतं. साधी त्यांची चौकशीही कोणी करत नव्हतं", असं मुश्ताक खान म्हणाले.
'मला इंडस्ट्रीतून बाहेर जावं लागेल'; जेव्हा राजेश खन्नांनी मागितली होती सलीम-जावेद यांच्याकडे मदत
पुढे ते सांगतात, "मी राजेश खन्ना यांच्यासोबत दो दिलों के खेल में या सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाच्या सेटवर त्यांच्यासोबतचं चित्र पार वेगळं होतं. त्यांच्या पाठिशी कोणीही उभं नव्हतं. ही फिल्म इंडस्ट्री अशीच आहे. आणि तुम्हाला त्याचा स्वीकार करावाच लागतो. प्रत्येकाच्या बाबतीत हेच घडतं. सगळ्यांनी त्यांना एकटं सोडलं होतं."
दरम्यान, मुश्ताक यांनी या मुलाखतीमध्ये स्वत:च्या करिअरविषयी सुद्धा भाष्य केलं. कलाविश्वात त्यांना कशी हीन दर्जाची वागणूक मिळाली, कसं दरवेळी कमी मानधन मिळत गेलं हे सुद्धा सांगितलं. मुश्ताक यांनी 'हम हैं राही प्यार के', 'वेलकम', 'दिल है की मानता नहीं' आणि 'मन' यांसारख्या अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं. मात्र, त्यांना म्हणावी तशी लोकप्रियता आणि स्टारडम मिळाला नाही.