Join us

भास-आभासांचा रहस्यमय लपंडाव

By admin | Published: July 15, 2017 1:23 AM

पूजा सावंत या अभिनेत्रीच्या प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळेपण लपलेले असते.

-राज चिंचणकरपूजा सावंत या अभिनेत्रीच्या प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळेपण लपलेले असते. ‘लपाछपी’ या चित्रपटात तर तिची मध्यवर्ती भूमिका आहे. त्यामुळे या भूमिकेबद्दल कुतूहल निर्माण होणे साहजिकच आहे. त्यात पुन्हा हा भयपट असल्याने त्यातली उत्सुकताही अधिक वाढते. ही उत्कंठा ताणून धरत पूजाने यातली ही भूमिका अशा टेचात रंगवली आहे, की तिने पडद्यावरून गायब होऊच नये, असे वाटत राहते. या भयपटातल्या भास-आभासांच्या खेळात पार गुंतवून टाकत पूजाने हा चित्रपट लक्षात ठेवण्यास मोठा हातभार लावला आहे.या चित्रपटाची गोष्ट म्हटली, तर साधी आहे आणि त्याचवेळी ती प्रचंड गुंतागुंतीचीसुद्धा आहे. म्हणजे यातले रहस्य जोपर्यंत उघड होत नाही, तोपर्यंत तरी ही गोष्ट सरळमार्गी चालणारी वाटते. पण त्यानंतर मात्र ही गोष्ट चक्रावून टाकते. विशाल फुरिया व विशाल कपूर यांनी ही कथा व पटकथा बांधली आहे. तसेच विशाल फुरिया यांनी ती दिग्दर्शित करून मराठीत नव्याने भयपट ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टीतला वर्तमानकाळ पटण्याजोगा आहे; तर भूतकाळ नाइलाजाने पटवून घेणे भाग पडते. आठ महिन्यांची गर्भवती असलेली नेहा तिच्या नवऱ्यासोबत काही कारणांमुळे शहरातून एका गावात आली आहे. या गावातले भाऊराव आणि त्यांची पत्नी तुळसाबाई यांच्या घरात वास्तव्य करते. गर्भवती नेहाची काळजी वाहण्याची जबाबदारी तुळसाबाई मनावर घेतात. नेहाच्या या वास्तव्यात तिला अनेक विचित्र भास होऊ लागतात. अर्थात, हे भास आहेत की आणखी काही, ते गोष्टीत पुढे स्पष्ट होत जाते. या भयपटात श्वास रोखून धरावे असे प्रसंग अर्थातच आहेत आणि त्यातून दचकवणारी फ्रेम अनेकदा ओठ घट्ट दाबून धरायला भाग पाडते. ही पुनरावृत्ती चार-पाच वेळा तरी हमखास होते आणि यातले भय डोळ्यांसमोर उभे राहते. भयपटात वातावरणनिर्मितीला खूप महत्त्व असते आणि याचे व्यवधान बाळगून या चित्रपटाने केलेली कामगिरी ठीक आहे. उसाचे शेत आणि त्यातला जुनाट वाडा यासुद्धा यात व्यक्तिरेखा म्हणून ठसतात. विशेषत: उसाच्या शेताच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही गोष्ट चित्रपटाला वेगळाच ‘फिल’ देते. परंतु, या गोष्टीतला भूतकाळ जेव्हा उलगडत जातो आणि वर्तमानात घडणाऱ्या घटनांची संगती जेव्हा लागते; तेव्हा मात्र गोष्टीतले काही कच्चे दुवे दिसायला लागतात. योगायोगाच्या गोष्टींतून कथा थोडी भरकटल्याचे जाणवते. तसेच, यात अधूनमधून येणारा ब्लॅकआऊटचा ‘स्विच आॅन-आॅफ’चा प्रकारही त्रासदायक ठरतो. पण या सगळ्याचे आकलन होईपर्यंत पुढे काय होणार याची उत्सुकता वाढवत या गोष्टीने मनावर गारुड करण्याचे काम बजावलेले असते. पूजा सावंत हिची अभिनयातली चोख कामगिरी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. तिने यातले आईपण उत्तम ‘कॅरी’ केले आहे आणि ती यात दिसलीही छान आहे. उषा नाईक यांनी रंगवलेली तुळसाबाईसुद्धा भन्नाट आहे. त्यांना विक्रम गायकवाड, अनिल गवस आदी कलावंतांनी चांगली साथ दिली आहे. भयपटाला न्याय देईल असा कॅमेरा यात फिरला आहे. भयरसाच्या माध्यमातून ज्यांना स्वत:ला दचकवून घेण्याची आवड आहे, त्यांना मात्र या ‘लपाछपी’च्या खेळात सामील होणे क्रमप्राप्त आहे.