‘किल्लारी’ हे नाव कानावर पडताच आजही अंगावर काटा उभा राहतो. २२ वर्षांपूर्वी लातूर जिल्ह्यातल्या या गावात पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी भूकंप झाला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. ‘३:५६ किल्लारी’ या चित्रपटाने या घटनेची पार्श्वभूमी घेऊन दाहक वास्तवाची रहस्यमय गुंफण करत एक थरारक कथा मांडली आहे. भय, गूढ, थरार, रहस्य अशा बाजाचे काही चित्रपट येऊन गेले असले, तरी या चित्रपटाची धाटणी वेगळी आहे आणि त्याची मांडणीही हटके आहे.शरयू ही ८-१० वर्षांची मुलगी एका अपघातात आई-वडिलांना गमावून बसते. यानंतर ती तिच्या आजी-आजोबांकडे गावाला येते. येथे भयानक भूकंप झालेला असतो आणि त्याचे चटके हे गाव अनुभवत असते. या गावातली मुले तिथल्या एका मिशनरी शाळेत शिकत असतात म्हणून शरयूलाही या शाळेत पाठवले जाते. इथले फादर आणि माधवी नामक समुपदेशिका शरयूची जबाबदारी स्वीकारतात. मात्र शरयूचे वागणे माधवीला खटकत असते. तिचे काही तरी नक्कीच बिनसले आहे; हे माधवीला सतत जाणवत राहते. एक दिवस शरयू, तिचे नाव अनघा असल्याचे माधवीला सांगते आणि ती तिच्या म्हणण्यावर ठाम असल्याचे पाहून माधवी हबकते. माधवी फादरच्या कानावर सदर बाब घालते. त्याच वेळी या शाळेत काही अनाकलनीय घटना घडायला सुरुवात होते आणि कुठे तरी काही तरी पाणी मुरतेय या विचाराने फादर अस्वस्थ होतात. या घटनांशी शरयूचा काय संबंध असतो अन् अनघा कोण याचे गूढ चित्रपटाची रुची वाढविते.दीपक भागवत याने या चित्रपटाची कथा, पटकथा व संवाद लिहिले असून, दिग्दर्शन त्याने व विजय मिश्राने केले आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर एक थरारक असा अनुभव देण्याचे दीपकने मुळातच पक्के केल्याने चित्रपटाची मांडणी त्यादृष्टीने अचूक झाली आहे. गूढ वातावरणनिर्मितीला पोषक असणारे सगळे प्रयोग यात केले गेले आहेत. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवायचेच याचे भान सुटू दिलेले नाही.पण कथेत बरीच आडवळणे आहेत आणि पटकथा बांधताना अनेक प्रसंगांची केलेली पेरणी जरा जड जाते. कथेतल्या काही गोष्टी वास्तव पातळीवर तोलून पाहताना पटतीलच असे नाही; परंतु त्यांचे निराकरण लेखकाने चित्रपटात केले आहे. एखादा प्रसंग नाटकी अंगाने केल्याचेही जाणवते; मात्र सर्वंकष असा अनुभव देताना हा चित्रपट अजिबात कमी पडत नाही. विजय मिश्रा यांचा कॅमेरा भन्नाट फिरला असून, वास्तव लोकेशन्सवर झालेले चित्रीकरण चित्रपटाच्या विषयाला साजेसे आहे. चिनार-महेश यांचे पार्श्वसंगीत चित्रपटाच्या गूढतेत भर घालणारे आहे. अभिनयाच्या पातळीवर चित्रपटाचे आकर्षण ठरले आहे, ते म्हणजे यात फादरची भूमिका साकारणाऱ्या जॅकी श्रॉफ यांचे! त्यांनी ही भूमिका समरसून केली आहे. अर्थात त्यांचे संवाद डब करण्यात आले असले तरी त्यांनी ही बाब कुठेही जाणवू दिलेली नाही. त्यांचा अप्रतिम वावर लक्षवेधी आहे. सई ताम्हणकरने माधवीच्या भूमिकेत आवश्यक ते रंग भरले आहेत. गौरी इंगवले हिने यात शरयू साकारताना तिला अभिनयाची चांगली समज असल्याचे दाखवून दिले आहे. गौरी कोंगे छोट्याशा भूमिकेतही लक्षात राहते. अनुराग शर्मा, श्रीकांत मोघे, पंकज विष्णू आदी कलाकारांची योग्य साथ चित्रपटाला मिळाली आहे. एकूणच, रहस्य आणि भन्नाट थरार अनुभवायचा असेल तर या चित्रपटाची ३ वाजून ५६ मिनिटांची वेळ लक्षात ठेवणे भाग आहे.
दाहक वास्तवाची रहस्यमय गुंफण
By admin | Published: August 21, 2015 11:22 PM