छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. मात्र छोट्या पडद्यावर वर्षानुवर्षे मालिकांची भाऊगर्दी झाली आहे. मालिकांमधून रसिकांचं मनोरंजन होतं, एकामागून एक भागातून घराघरात या मालिका लोकप्रिय ठरतात आणि ठराविक काळानंतर या मालिका रसिकांचा निरोप घेतात. मात्र मालिकेच्या हटके कथानकामुळेच पुन्हा एकदा मालिका सुरु व्हावी अशी रसिकांची ईच्छा असते.
रसिकांच्या ईच्छेमुळेच पुन्हा एकदा सुपरहिट मालिका रसिकांच्या मनोरंजनासाठी टीव्हीवर दाखल होत आहे. छोट्या पडद्यावर 'नामकरण' ही मालिका पुन्हा सुरु केली जाणार आहे. दिग्दर्शक महेश भट यांचे जीवन आणि त्यांचा बॉलिवूड सिनेमा 'जख्म' यावर हा शो बेतलेला होता. टीव्हीवर ही मालिका प्रचंड गाजली होती. शेमारू टीव्हीवर २० जुलैपासून ही मालिका पुन्हा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे. 'नामकरण' ची कथा आहे ११ वर्षांच्या अन्वीची जी आपली आई आशासोबत राहते आहे. अन्वीची तिच्या आईसोबत खास गट्टी आहे आणि त्या दोघी एकमेकींसोबत आनंदात असतात. पण अन्वीच्या मनात एक सल आहे, तिला तिच्या वडिलांची खूप आठवण येते.
तिच्या वडिलांचे आशासोबत कायदेशीररित्या लग्न झालेले नसते.आपल्या आईवडिलांच्या नात्याची नेमकी ओळख तरी काय, हे समजून घेताना अन्वीला खूप कष्ट पडतात पण तरी आपल्या आईला खुश ठेवण्यासाठी जे-जे करणे शक्य आहे ते सर्व ती करत असते.'नामकरण' मध्ये छोट्या अन्वीच्या भूमिकेत आहे अर्शीन नामदार जिची निवड स्वतः महेश भट यांनी केली होती. विराफ पटेल, बरखा सेनगुप्ता, सायंतनी घोष व दिवंगत रीमा लागू यांनी देखील या शोमध्ये भूमिका केल्या आहेत. हा शो पुन्हा प्रक्षेपित होत असल्याबद्दल सर्व कलाकारांनी अतिशय आनंद व्यक्त केला आहे.