कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे सामान्य लोकच नव्हे तर अनेक सेलिब्रेटी देखील आपल्या घरातून बाहेर पडत नाहीयेत. प्रत्येकाने घरातच राहावे असे आवाहन लोकांना केले जात आहे. देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेक ठिकाणी खाण्या-पिण्याच्या वस्तू देखील मिळत नाहीयेत. तसेच काही भागांमध्ये औषधांचा पुरवठा देखील खूपच कमी प्रमाणात होत आहे. लॉकडाऊनच्या या परिस्थितीत एका अभिनेत्रीवर अतिशय वाईट परिस्थिती आली आहे. ही अभिनेत्री नुकतीच कॅन्समधून वाचली आहेत. पण सध्या दररोजचं जेवण आणि औषधं देखील मिळत नसल्याने या अभिनेत्रीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.
अभिनेत्री नफिसा अली सध्या गोव्यात असून त्यांना दररोजचं जेवण आणि त्यांची औषधं मिळणं देखील कठीण झाले आहे असे त्यांनी हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मी गोव्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीला फिरण्यासाठी आले होते. पण सध्या लॉकडाऊनमुळे मी गोव्यातील मोर्जिम या परिसरात अडकले आहे. गेल्या सहा दिवसांपासून इथली सगळी दुकानं बंद आहे. किराणा मालाची दुकानं देखील बंद असल्याने दररोज गरजेच्या असलेल्या वस्तू देखील मिळत नाहीयेत. मी नुकतीच कॅन्सरमधून बचावली आहे. मला योग्य वेळेत खाण्याची गरज असते. तसेच न चुकता औषधं घ्यावी लागतात. पण इथे धान्य, फळे, भाज्या काहीच मिळत नाहीये. त्यामुळे सुके पदार्थ खाऊन मी दिवस ढकलत आहे. पंजीममध्ये परिस्थिती चांगली असल्याचे मी ऐकले आहे. पण तिथे जाणे माझ्यासाठी शक्य नाहीये. मी केवळ दहा दिवसांसाठी फिरायला आले असल्याने आता माझी औषधं देखील संपली आहे. येथे मला लागणारी औषधं उपलब्ध नाहीत आणि पंजीममध्ये जाऊन मी ती घेऊ शकत नाहीये. कुरिअर सर्व्हिस बंद असल्याने मी औषधं कुठून मागवू देखील शकत नाहीये.
कोरोनाने जगभरात थैमान घातल्याने जागतिक आरोग्य संघटनेकडून या साथीला महारोगराई घोषित करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टड्रॉस गेब्रेयेसस यांनी जिनेव्हामध्ये म्हटलं आहे की, कोरोनाला आता जागतिक महामारी म्हटलं जाऊ शकतं. यासारखी महामारी कधी पाहण्यात आलेली नव्हती. आगामी दिवस आणि आठवड्यांमध्ये विषाणूबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.