Join us

'घर बंदुक बिर्याणी'मधील पल्लमची भूमिका साकारणार होते नागराज मंजुळे, पण मग झाली सयाजी शिंदेंची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2023 2:44 PM

Sayaji Shinde : मराठीसह हिंदी, तमीळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची छाप उमटविणारे सयाजी शिंदे मराठीत पहिल्यांदाच अशा वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

झी स्टुडियोजच्या 'घर बंदुक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) चित्रपटाच्या ट्रेलर, प्रोमो आणि गाण्यांनी सध्या चांगलीच हवा तयार केली आहे. प्रेक्षक या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. विशेष बाब म्हणजे या चित्रपटात पहिल्यांदाच नागराज मंजुळे (Nagraj Manjule) आणि सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. यात नागराज मंजुळे राया पाटील ही पोलिस इनस्पेक्टरची भूमिका साकारत आहेत, तर सयाजी शिंदे एका गुंडाच्या टोळीचा सरदार असलेल्या पल्लमची भूमिका साकारत आहेत.

मराठीसह हिंदी, तमीळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची छाप उमटविणारे सयाजी शिंदे मराठीत पहिल्यांदाच अशा वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यावर चित्रीत झालेल्या आहा हेरो या गाण्याने यापूर्वीच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. खरेतर सयाजी शिंदे साकारत असलेली पल्लम ही व्यक्तिरेखा अगोदर स्वतः नागराज मंजुळे साकारणार होते, परंतु या भूमिकेसाठी आपल्यापेक्षा जास्त योग्य नाव सयाजी शिंदे यांचं असेल असा विचार नागराज यांच्या मनात आला. त्यांनी या भूमिकेबद्दल सयाजी शिंदे यांना विचारलं आणि सयाजी शिंदे यांनी यासाठी तात्काळ होकार दिला.

या भूमिकेबद्दल सयाजी शिंदे सांगतात की, नागराज सोबत काम करण्याची अनेक दिवसांपासूनची इच्छा होती. त्याच्या दिग्दर्शनाचा मी खूप मोठा चाहता आहे. त्याने जेव्हा ही गोष्ट मला ऐकवली तेव्हा ही गोष्ट, चित्रपटाचं शीर्षक आणि पल्लम ही भूमिका मला खूप आवडली. मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळ्या धाटणीची अशी ही भूमिका आहे. प्रेक्षकांसाठी ही सरप्राइज ठरेल अशी ही भूमिका असणार आहे. याशिवाय नागराजने साकारलेली पोलिस इनस्पेक्टरची भूमिकाही त्याच्या चाहत्यासाठी विशेष पर्वणी ठरेल असा विश्वास मला आहे.

टॅग्स :नागराज मंजुळेसयाजी शिंदे