नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule ) ‘झुंड’ (Jhund) हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि यानिमित्ताने नागराज यांच्या पाठीवर अनेकांच्या कौतुकाची थाप पडली. समीक्षकांनी या चित्रपटाला दाद दिलीच. पण आमिर खान सारख्या दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याचेही नागराज यांचा हा सिनेमा पाहून डोळे पाणावले. अनेक मराठी कलाकारांनीही या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. सोशल मीडियावर मात्र नागराज यांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने दोन गट पडलेले दिसले. काहींनी नागराज यांनी ‘झुंड’ मराठीत का केला नाही? असा सवाल केला. तर काहींनी नागराज केवळ वंचित घटकाचे चित्रपट बनवतात,अशा आशयाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष टीका केली. आता नागराज यांनी या टीकेला उत्तर दिलं आहे.‘साम’ टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते यावर बोलले. सोशल मीडियावरची टीका मी अजिबात गांभीर्यानं घेत नाही. कारण सोशल मीडियाला डोकं नसतं, चेहरा नसतो, असं ते म्हणाले.
काय म्हणाले नागराज?‘सोशल मीडिया मला मशीनसारखा वाटतो. लोक अर्वाच्य भाषेत टीका करतात. माझ्या चित्रपटाबद्दल खरंच तक्रार असेल तर त्याने माझ्यासमोर येऊन बोलावं. चित्रपटात काही चुका असतील आणि त्या तुम्ही मला प्रत्यक्ष सांगितल्या तर मी माझे मुद्दे मांडू शकेल. मला जे काही सांगायचं होतं ते मी चित्रपटातून सांगितलं आहे. आता त्याला वेगळी पुरवणी जोडायची काय गरज आहे? शेवटी एकमेकांना समजून उमजूनच पुढे जावं लागणार आहे,’असं नागराज म्हणाले. नागराज यांनी ‘झुंड’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन लीड रोलमध्ये आहेत. शिवाय रिंकू राजगुरू व आकाश ठोसर यांच्याही भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसवरहा सिनेमा चांगली कमाई करतोय. पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने 6.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.