‘फॅन्ड्री’ हा सिनेमा म्हणजे नागराज मंजुळे यांची अप्रतिम कलाकृती आहे. समाजाचे वास्तव मांडणा-या या सिनेमाने प्रेक्षक आणि समीक्षक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात काम करणारेही अस्सल ग्रामीण बाज असलेले कलाकार होते. सोलापूर जिल्ह्यातील सोमनाथ अवघडे याने चित्रपटात जब्याची भूमिका साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. तर अभिनेत्री म्हणून नागराज यांनी राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) हिची निवड केली होती. तिने साकारलेली शालूची भूमिकाही प्रचंड गाजली होती़. तिच्या चेह-यावरचे हावभाव, तिचा सहजसुंदर अभिनय चाहत्यांना भावला होता. सोज्वळ चेह-याची हीच शालू अर्थात राजेश्वरी खरात सध्या चर्चेत असते ती तिच्या डान्स व्हिडीओंमुळे. चाहत्यांसाठी ती रोज नवे वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. फेसबुकवर तिने नुकताच स्वत:चा एक डान्स व्हिडीओ पोस्ट केला आणि हा व्हिडीओ पाहून काही लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
आता या ट्रोलर्सला राजेश्वरीने सणसणीत उत्तर दिले आहे. मर्दानगी दाखवायची जास्तच हौस असेल तर एका मुलीच्या कमेंट बॉक्समध्ये दाखवण्यापेक्षा तुमच्या नेत्या समोर दाखवा, असे तिने ट्रोलर्सला सुनावले आहे़
काय म्हणाली राजेश्वरी...
स्वत:च्या डान्स व्हिडीओवर कमेंट करताना राजेश्वरीने ट्रोलर्सला सुनावले. ती म्हणाली,‘अरे यार, मी काय म्हणतेय...तुम्ही सर्वजण माझ्यावर एवढे प्रेम करता माझ्या सर्व पोस्ट तुम्हा सर्वांमुळे चर्चेत येतात, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे खरच मनापासून आभार मानते. आणि फक्त एवढेच सांगते की, मला ट्रोल झाल्याने काही एक फरक पडत नाही मित्रांनो. फक्त एवढाच जोर असेल, पुरुषत्व (मर्दानगी) दाखवायची जास्तच हौस असेल तर एका मुलीच्या कमेंट बॉक्स मध्ये दाखवण्यापेक्षा तुमच्या नेत्या समोर दाखवा.मला बोलता ना, पूरग्रस्तांसाठी काही केले का, की फक्तं शॉर्ट्स घालून नाचतेय .. अरे मूर्खांनो, या सर्व कामांसाठी सरकार प्रशासन जबाबदार आहे, तुम्ही ज्याला निवडून दिले तो सो कॉल्ड साहेब, नेता जबाबदार आहे मी नाही. तेथे गार पडता म्हणुन कोणालाही जोर दाखवायचा ???मी मान्य करते की सर्वांनी मदतीचा हात दिला पाहिजे परंतु आपण जो टॅक्स भरतो ना, त्याचा जाब विचारायला पण शिका नाहीतर आहेच़ माझ्या कमेंट बॉक्स जागा.. Always Welcome...